सटाणा – औरंगाबादच्या सिडको महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी देण्याचा आमिष देऊन फसविणाऱ्यास सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत (१२ नोव्हेंबर) पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पवार (४२, रा. लोहणेर, ता. देवळा) याने बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील दिलीप सुकदेव मोरे यांच्याशी संपर्क साधला. मुलाला औरंगाबादच्या सिडको महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यासाठी ८ लाख रुपये लागतील, असेही सांगितले. टोकन म्हणून २ लाख रुपयेही त्याने घेतले. ही बाब २०१६ मध्ये घडली. त्यानंतर सातत्याने पवार याने मोरे यांना चकविले. आज-उद्या तसेच काही दिवसात काम होईल, अशी आश्वासने दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी पोलिसांकडे जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे पवार याने महाराष्ट्र बँकेचा चेक देवून थोडे दिवस थांबण्याचे सांगितले. तरीही पैसे मिळाले नाही. अखेर मोरे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.