सटाणा – गेल्या काही दिवसांपासून येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या सटाणा-नाशिक बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच येत्या सोमवार (१७ ऑगस्ट) पासून दररोज बसच्या पाच फेर्या करण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांनी दिली आहे.
सटाणा आगारातून सटाणा-नाशिक बस सेवा सुरू करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता व दुपारी ३.१५ वाजता असे दोन फेर्या सुरू करण्यात आल्यानंतर प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांची होणारी गर्दी व मागणी लक्षात घेता सटाणा आगारातुन सोमवारपासून सकाळी ७.३०, १०.००, दुपारी १२.३० व ३ तर शेवटची बस सायकांळी ६ वाजता सुटणार आहे. तसेच नाशिक येथून परतीच्या प्रवाशांसाठी सकाळी ७.३०, १०.००, दुपारी १२.३० व ३ तर शेवटची बस सायकांळी ६ वाजता नाशिक येथून सटाणासाठी सोडण्यात येणार आहेत. कोवीड १९च्या पार्श्वभूमीवर एका बसमध्ये २२ प्रवाशी संख्या असून नियमित भाडे आकारण्यात येणार आहे. या बसेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बिरारी यांनी केले आहे.