सटाणा::- देशी-विदेशी दारूचे बॉक्स घेऊन भरधाव वेगाने जाणारा टेम्पो ट्रक पलटी होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सटाणा-देवळा मार्गावर घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दारूच्या बॉक्स खाली दबलेले ड्रायव्हर,क्लिनर व अन्य दोन प्रवाशांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले.टेम्पोचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असून टेम्पो पलटी झाल्यानंतर या संधीचा फायदा घेत काही तळीरामानी रस्त्यावर पडलेले दारूचे बॉक्स व बाटल्या लंपास करून पोबारा केला
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार एमएच -१५- एजी – ५८८६ हा टेम्पो ट्रक देशी-विदेशी दारूचे बॉक्स घेऊन नाशिक येथून बागलाणच्या ताहराबाद येथे भरधाव वेगाने जात असतांना सटाणा-देवळा मार्गावर टायर फुटला आणि टेम्पो भर रस्त्यावर पलटी झाला. टायर फुटल्याचा आवाज ऐकुण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोत ड्रायव्हर,क्लिनरसह आणखी दोन प्रवासी होते. चौघे दारूच्या बॉक्स खाली दाबले गेले होते. पोलीस व नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. टेम्पो पलटी झाल्यानंतर त्यातील दारूचे बॉक्स व बाटल्या रस्त्यावर पडलेल्या होत्या काही तळीरामानी संधी साधून दारूचे बॉक्स लंपास करून पोबारा केला. अपघातामुळे सटाणा-देवळा मार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली होती.