सटाणा – विंचूर-प्रकाशा महामार्ग क्र.७ वरील सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर असलेल्या वनोली जवळ मालवाहतूक ट्रक आणि पीकअप यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात ३ जण ठार तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास निफाड तालुक्यातील चांदोरी येथून काम संपवून डांगशिरवाडे (ता. साक्री) येथील मजूर पीक अप (एमएच १५ एफव्ही ४८३९) या वाहनाने घरी परतत होते. त्याचवेळी वनोली नजिक म्हसोबा मंदिराजवळ खड्डे टाळण्याच्या नादात समोरून येणार्या माल ट्रक (टीएन ८८ वाय ८३९९) या वाहनावर पीकअप आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनातील ३५ ते ४८ प्रवाशी फेकले गेले. या अपघातात ट्रकच्या मागच्या चाकाजवळ पीक अप अडकला. यात कामराज ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालेगाव येथे ९ जणांना अधिक उपचारासाठी नेत असतांना बाबूराव सोनवणे व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. अन्य रुग्णांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अत्यवस्थ असलेल्या तीन जणांना नाशिक येथे तर ९ जणांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. तर चार महिला, चार पुरुष व चार लहान मुले सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कामराज रबा ठाकरे (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. बाबुराव सोनवणे (वय ५५) यांचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला आहे. मालेगाव यथे उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नाव समजू शकलेले नाही. या अपघातात महेंद्र देसाई (वय २७), बंडू सोनवणे (वय ४०) यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. सुरेश पवार (वय ८), पूजा पवार (वय ८), गणेश सोनवणे (वय ४), गोरख सोनवणे (वय ३५), सुनंदा सोनवणे (वय २८), अर्जुन सोनवणे (वय ३०), गोविंदा सोनवणे (वय ३०), लक्ष्मण सोनवणे (वय २८) जोशविन सोनवणे (वय १८) यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.