निलेश गौतम
….
सटाणा – थकबाकीदार शेतक-यांच्या कर्जाची वसूली व्हावी यासाठी जिल्हा बँकेने शक्कल लढवत त्यांचे इतर बँकेचे खाते अॅटॅचमेंट दिल्यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहे. हे खात्याचे व्यवहार होल्ड केल्यामुळे शेतक-याला पैसे टाकता येईल, पण, पैसे काढता येणार नाही. त्यासाठी त्याला जिल्हा बँकेची एनओसी आणावी लागणार आहे. या सर्व प्रकारामुळे शेतक-यांमध्ये मात्र संताप आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणावर असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी बँकेने ही अनोखी शक्कल लढवली आहे. आता या थकबाकीदार शेतक-यांच्या ज्या ज्या राष्ट्रीयकृत बँका मध्ये बचत खाते आहेत. अशा सर्व बँकांना पत्रव्यवहार करून या थकबाकीदार खात्यांचे चालू माहिती संकलीत केली आहे. यासाठी स्थानिक शाखेमधून गावातील राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाला पत्र व्यवहार करून प्रत्येक खात्याचा तपशील तपासला जात आहे. या तपशीलची माहिती घेऊन या शेतकऱ्याच्या खात्यावरील कुठलीही रक्कम त्या शेतकऱ्याला काढता येऊ नये अशी व्यवस्था बँक प्रशासनाने केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात मोठी संतापाची लाट उसळली आहे. आमच्या इतर बँक खात्यावर जिल्हा बॅँकने दावा करणे चुकीचे असून बँक खात्याचा तपशील खातेदार सोडून कोणालाही देण्याचा अधिकार नाही. जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी आधार नंबरचा ”आधार ”घेऊन शेतकऱ्यांचा तपशील कसा नेत आहेत यावरच या थकबाकीदार शेतक-यांचा आक्षेप आहे.
सरकारने वेळोवेळी कर्जमाफीची आमिष दाखवत शेतकऱ्याला फसविल्यानेच शेतकरी थकबाकीदार झाला असून सरकार एकीकडे सातबारा कोरा करण्याची भाषा करीत असताना दुसरीकडे मात्र आहेत ते बँकखाते अॅटॅच करत आहे. गेल्या वर्षभरात कोरोना, अतिवृष्टी मध्ये सापडलेला शेतकरी आता जिल्हा बँकेच्या कचाट्यात सापडला असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.
१०५ कोटीं ९१ लाख थकबाकी
बागलाण मधील १८ हजार शेतकऱ्यांकडे १०५ कोटीं ९१ लाख थकबाकी आहे. सहकार अधिनियम १५६ नुसार बँकेला वसुलीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. यासाठी बँक प्रशासन वसुलीसाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यानी सहकार्य करावे जेणेकरून आमच्या बँकेत ज्या खातेदारांचे पैसे अडकले आहेत. त्यांना परत करण्यास मदत होईल. तर बागलाण मधील ३१ मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे शेतजमीनीचे लिलाव करण्यात येणार आहेत.
आर .एस.भामरे
सटाणा विभागीय अधिकारी, जिल्हा बँक
खाते होल्ड करण्याचे लेखी पत्र
नाशिक जिल्हा बँकने थकबाकीदार खातेदारांचे खाते होल्ड करण्याचे लेखी पत्र कलम १५६ चा आधार घेऊन दिलेले आहे . यावरून बँक खाते बंद केले आहेत. ज्या शेतकऱ्यानी आमच्याकडे बँकेचे कुठलेही येणे नसल्याचा दाखला आणून दिला. त्यांचे खाते पुर्ववत करण्यात येईल कोणत्याही खातेदाराची अडवणूक केली जाणार नाही.
हिमांशू भंगोत्रा, व्यवस्थापक
बँक ऑफ महाराष्ट्र डांगसौंदाने