सटाणा – सटाणा शहरानजीक असलेल्या विंचूर शहादा राज्य महामार्ग वरील यशवंनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे (वय ५५ रा.सामोडे ता.साक्री हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये रिव्हालवरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सटाणा परिसरात घडली आहे.
आज बुधवार दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे ही मोठे उद्योजक असल्याची माहिती मिळते आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदलाल शिंदे हे MH 15 FT 0133 या स्कोडा रॅपिड कार मधून सामोडे ता. साक्री येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवंनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे.
माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाणा जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी आपल्या मावस भावाला मोबाईल द्वारे कळवले होते. दरम्यान शिंदे यांचा मावसभाऊ व इतर काही नातेवाईक ताहाराबाद जवळ होते. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक ताहाराबाद रोडवरील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर पोहोचले असता नंदलाल शिंदे हे आपल्या स्कोडा कार मध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
सटाणा पोलिसांना या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्वर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.