सटाणा – बागलाण तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्ण होणारच आहेत. त्यामुळे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना आंदोलन करण्याची वेळच आम्ही येऊ देणार नाही अशी ग्वाही बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. याबाबत बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, वर्षभरापूर्वी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होताच राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
गेल्या पंचवार्षिक कालावधीत विधानसभेमध्ये हरणबारी डावा उजवा कालवा, केळझर चारी क्रमांक आठ, तळवाडे भामेर पोहोच कालवा तसेच गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी साल्हेर एक व दोन तसेच वाघंबा वळण योजनेचे पाणी केळझर व हरणबारी कालव्यांसाठी आरक्षित करून घेतले होते. आज मी जरी आमदार नसली तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तालुक्याच्या विकासासाठी माझ्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे अप्पर पुनंद योजना, मांजरपाडा-२ या प्रकल्पांनाही तातडीने मंजूरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहेत. तालुक्यातील सिंचनाचे पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असून या सरकारच्या कार्यकाळातच तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होतील, असा ठाम विश्वास असल्याने खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्यावर आंदोलन करण्याची आम्ही वेळ येऊ देणार नाही. बागलाण तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच सटाणा किंवा नामपूर येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबद्दल चर्चा घडवून आणि प्रलंबित प्रकल्पांना मान्यता मिळवून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे माजी आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले