पिंपळनेर, ता. साक्री – सटाणा-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
धस यांनी मृत झालेल्या कामगारांच्या घरी डांगशीरवाडे (ता. साक्री) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मृत्युमुखी पडलेल्या तीन उसतोड कामगारांच्या अपघाताचा सखोल तपास करण्यात यावा. दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व कारखानदार/शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी ऊसतोड कामगार संघटनेचे नेते असलेल्या धस यांच्या उपस्थितीत येथील विद्यानंद हायस्कूलमध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पंडीत दीनदयाल उपाध्याय आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून अॅड संभाजीराव पगारे, उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, सरचिटणीस शैलेंद्र आजगे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता पगारे, जि. प. सदस्य खंडू कुवर, उसतोड कामगार संघटनेचे विष्णुपंत जायभये, सुरेश वणवे, मंडलाध्यक्ष मोहन सुर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पिंपळनेर, सामोडे, म्हसदी, शेणपूर, चिकसे, पश्चिम साक्री तालुक्यातील उसतोड मुकादम व मजूर यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करतांना धस यांनी उसतोड कामगारांच्या अनेक संवेदनशील प्रश्नांना हात घातला.