अयोध्या – प्रभूरामचंद्रांचे जन्मस्थान असलेली अयोध्यानगरी आज ऐतिहासिक घटनेची साक्षीदार झाली. गेल्या ५०० वर्षांपासून ज्या घटनेची सर्वजण वाट पाहत होते ती बुधवारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौतन्यमत वातावरणात भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह १५० मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशवासियांचे लक्ष अयोध्येकडे लागले होते. अतिशय प्रसन्न वातावरणात भूमीपूजन समारंभ संपन्न झाला. जवळपास तीन तासांच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सारेच डोळे लावून होते. दूरदर्शन या सरकारी दूरचित्रवाहिनीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान अयोध्येत आले. ११.४० वाजता त्यांनी हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेऊन पूजन केली. १२ वाजता त्यांचे रामजन्मभूमी स्थळी आगमन झाले. तेथे रामलल्लाचे त्यांनी दर्शन घेतले. १२.३० वाजता भूमीपूजन सोहळ्यास प्रारंभ झाला. १२ वाजून ४५ मिनिटांनी भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी मुख्य शिलेवर पंतप्रधान नवरत्नजडीत पंचधातूद्वारे निर्मित कमलपुष्प अर्पण केले. त्यानंतर मोदींसह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले. प्रारंभी आदित्यनाथ यांनी भाषण केले. त्यानंतर सरसंघचालक भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांसह देशवासियांना संबोधित केले. त्यानंतर समारंभ सोहळा संपन्न झाल्याचे घोषित करण्यात आले. कोरोनाचा संकटकाळ सध्या सुरू असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हा सोहळा संपन्न करण्यावर विशेष भर देण्यात आला.