मुंबई – कारमध्ये स्फोटके ठेवण्यामागील मास्टरमाईंडला शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी एनआयएला भरभक्कम पुरावे मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. दरम्यान, वाझे यांचे पोलिस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने त्यांना ११ दिवस कोठडी सुनावली. विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त एस.चैतन्य यांनी दिली आहे. सचिन वाझे सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत होते.
या कालावधीत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आवश्यक पुरावे जमविण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यांच्यासह एका सहायक आयुक्त व अन्य काही पोलिसांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, वाझे यांची चौकशी करत असताना एनआयएकडे मोठे पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीच्या सुरुवातीला वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलायला तयार नव्हते. परंतु मात्र, या अधिकाऱ्यांनी एक-एक करुन पुरावे दाखवल्यानंतर वाझे यांना कोणताही पर्याय उरला नाही. त्यानंतर वाझे यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली.
अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीवरील हाताचे ठसे एनआयएने तपासासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत मोठी भर पडल्याचे सांगितले जाते. मात्र, सचिन वाझे यांनी अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही.