मुंबई – मुकेश अंबानीच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलीसमधील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेला अटक केली आहे. सचिन वाझे शनिवारी आपले बयाण नोंदविण्यासाठी एनआयएच्या कार्यालयात पोहोचले होते. लांबलचक चाललेल्या चौकशीनंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली. त्यापूर्वी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. दरम्यान, याप्रकरणी एनआयएकडून अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची चिन्हे आहेत. यासाठीच एनआयएची पथके या अधिकाऱ्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो आढळल्याच्या प्रकरणाची एएनआय चौकशी करीत आहे. मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात एएनआयने सचिन वाझेची कसून चौकशी केली. त्याचवेळी त्याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे एएनआयने त्याला बयाण नोंदविल्यावर अटक केली. न्यायालयाने सर्व पुरावे वाझेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता वाझेची चौकशी सुरू झाली. मनसूख हिरेनसोबत कसा परिचय होता, त्याच्या स्कॉर्पियोचा वापर, स्कॉर्पियो चोरी झाल्यानंतर मुकेश अंबानीच्या घराबाहेर सापडणे आदींबाबत वाझेवर प्रश्नांची सरबत्ती झाल्याचे कळते. या चौकशीत वाझेच्या विरोधात भक्कम पुरावे एएनआयच्या हाती लागले आहेत. न्यायालयाने तर वाझेची चौकशी व्हायला हवी असे म्हटलेच होते, शिवाय विरोधीपक्षानेही विधानसभेत वाझेच्या अटकेची मागणी केली होती. त्यामुळेच वाझेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
वाझेंवर गंभीर आरोप – न्यायालय
न्यायालयाने म्हटले आहे की मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात हत्या, गुन्हेगारी षडयंत्र, पुरावे मिटवणे यासारखे गंभीर आरोप वाझेंवर आहे. मनसुख हिरेन 27 आणि 28 फेब्रुवारीला वाझे यांच्यासोबत होते. या प्रकरणात वाझेंवर मनसुख यांच्या पत्नीनेही गंभीर आरोप लावले आहेत.