नवी दिल्ली – राजस्थानातील गेल्या महिन्यापासूनचे सत्तानाट्य अखेर सोमवारी (१० ऑगस्ट) समेटाच्या मार्गावर आले. नाराज नेते सचिन पायलट यांची काँग्रेस नेते राहूल व प्रियंका गांधी यांनी समजूत काढली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर झाला गेला वाद विसरुन पुन्हा कामाला लागण्याचा निर्णय पायलट आणि काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे.
पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही पदे पुन्हा दिली जाणार आहेत. तसेच, राजस्थान सरकारच्या कारभारावर लक्ष ठेण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत हे कायम राहणार आहेत. मात्र, त्यांनी या सर्व प्रकरणाबाबत कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाही. पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक १८ आमदारांवरील कारवाईही काँग्रेस पक्षाच्यावतीने मागे घेतली जाणार आहे. दरम्यान, पायलट यांचे म वळविण्यात मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात आहे.