नवी दिल्ली – देशात कोविड १९च्या सक्रीय रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तीन पटीपेक्षा अधिक झाली आहे. देशभरात कोविडबाधितांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ झाली आहे. यापैकी ३० लाखापेक्षा अधिक रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या चौपट असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तपास, निदान आणि उपचार या तंत्रामुळे रुग्ण या संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण वाढलं असून, मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. सध्या मृत्यू दर पावणे दोन टक्के एवढा खाली आला आहे.
देशात गेल्या २४ तासात ६८ हजार ५८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर गेल्या २४ तासात ८३ हजार ८८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ११ लाख ७२ हजारापेक्षा अधिक कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एकूण तपासण्यांची संख्या आता चार कोटी ५५ लाख ९ हजारांवर पोहोचली आहे.