नवी दिल्ली – देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा विचार करता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेच्या आधीच गुंडाळण्याचे संकेत आहेत. यादरम्यान सरकारने कामकाजही वेगाने आटोपते घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित याच आठवड्यातही अधिवेशन गुंडाळले जाऊ शकते, अशीही शक्यता आहे.
वित्तीय कामकाज हेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्वांत महत्त्वाचे कामकाज आहे. आणि संसदेतील दोन्ही सभागृहांनी बुधवारीच हे कामकाज पूर्ण केले आहे. सरकारची काही महत्त्वाची विधेयके राहिलेली आहेत. ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारची धावपळ चालली आहे. अर्थात आजसुद्धा अधिवेशनाचे सूप वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्थात लांबलचक अजेंडा घेऊन सरकार या अधिवेशनात उतरले होते. हा अजेंडा पूर्ण झालेला नाही, मात्र सर्व महत्त्वाची विधेयके पूर्ण झाली आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच विरोधी बाकांवरील सर्व पक्षांनी ८ एप्रिलपूर्वीच अधिवेशन आटोपण्याची मागणी केली होती. जेणेकरून त्यांना निवडणुक प्रचारात सहभागी होता येईल. त्या पार्श्वभूमीवर होळीपूर्वी संसदेचे अधिवेशन संपविण्यावरही एकमत झालेले होते. त्यावर अंमल होण्याची आज शक्यता आहे.
आजच गुंडाळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थात गुरुवार हा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस ठरू शकतो. त्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही तसे चित्र मात्र नक्कीच आहे. कारण सर्व सत्ताधारी आणि विरोधी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये व्यस्त आहेत. अधिर रंजन चौधरी पश्चिम बंगालमध्ये व्यस्त असल्यामुळे लोकसभेत काँग्रेसला तर आपला नेताही बदलावा लागला आहे.