नवी दिल्ली – कोविड१९च्या पार्श्वभूमीवर संसदेचं पावसाळी अधिवेशन आज नियोजित कालावधीच्या आधीच संस्थगित करण्यात आले. १४ सप्टेंबरला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती, ते एक ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आलं होते. लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेतही मंजूर झाली असल्यानं वेळापत्रकाच्या आधीच सभागृहात कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं आज संसदीय कामकाज मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत सांगितलं. त्यानुसार आज राज्यसभेतील नियोजित कामकाज झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज संस्थगित करण्यात आलं. राज्यसभेत २५ विधेयक मंजूर झाल्याचं आणि सहा विधेयक मांडण्यात आल्याचं सभागृहाचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांनी सांगितलं. सदनाचं कामकाज शंभर टक्के क्षमतेनं झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. अशा कठीण काळातही अधिवेशनसाठी उपस्थित राहिल्याबद्दल नायडू यांनी सदस्यांचे आभार मानले. कोविड १९ च्या साथीशी लढा देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचीही त्यानी प्रशंसा केली.
लोकसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करत असल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.
तत्पूर्वी, राज्यसभेत आज परदेशी देणगी नियामक सुधारणा विधेयक २०२० आणि वित्तीय संस्था द्विपक्षीय नेटींग विधेयकही मंजूर करण्यात आलं. त्याचबरोबर कामगार कल्याणाच्या उद्देशानं मांडण्यात आलेल्या तीन कामगार विषयक विधेयकांनाही आज राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, अशा महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. काश्मीरी, डोगरी, हिन्दी, इंग्रेजी आणि उर्दू या भाषांना जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता देणारं विधेयकही आज राज्यसभेत मंजूर झालं.
देशातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचं आज केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं.
एक एप्रिलपर्यंत एकूण ६३ हजार ६३१ किलोमीटर्स लांबीच्या मार्गापैकी ६३ टक्के मार्गांचे काम पूर्ण झालं असून, उर्वरीत २३ हजार ७६५ किलोमीटर मार्गांचे काम बाकी असल्याचं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेत आज नोव्हेंबरमध्ये कार्यकाल संपणाऱ्या अकरा सदस्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. या सदस्यांनी दिलेल्या योगदानाचे सभागृहाला नेहमीच स्मरण राहील, त्यांची उणीव कायम भासेल, अशा शब्दांत अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.