न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत भारतीय वंशाची महिला अधिकारी आकांक्षा अरोरा (वय ३४) यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसपदासाठी दावा जाहीर केला आहे. या पदावर दावा करणाऱ्या आकांक्षा या पहिल्या महिला असून विद्यमान सरचिटणीस गुटेरेस यांनीही दुसऱ्यांदा या पदावर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
येत्या डिसेंबर मध्ये महासचिवपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नवीन सरचिटणीसांचा कार्यकाळ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. आकांक्षा या सध्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) ऑडिट समन्वयक आहेत. आकांक्षा यांनी एसएमएस, हॅशटॅगद्वारे जाहिरात व प्रचार देखील सुरू केला असून अडीच मिनिटांचा व्हिडीओ मेसेज तयार केला आहे.
आकांक्षा यांचा जन्म भारतात झाला असून त्यांच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व देखील आहे. प्रशासकीय अभ्यासात त्यांनी बॅचलर पदवी तसेच कोलंबिया विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
आकांक्षा यांच्या उमेदवारीबाबत सरचिटणीस व प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे की, विद्यमान सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आणखी पाच वर्षे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे आकांक्षा यांच्या दाव्यावर भाष्य करणार नाही.
तर जनरल असेंब्लीचे अध्यक्ष व्हॉल्कन बोजकीर ब्रीडेन वर्मा यांनी म्हटले आहे की, आकांक्षा यांचे याबाबत कोणतेही पत्र आलेले नाही. गुटेरेस १ जानेवारी २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव झाले असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात एकाही महिलेने अद्यापपर्यंत महासचिवपदाची जबाबदारी सांभाळलेली नाही. म्हणूनच आकांक्षा यांच्या उमेदवारी आणि दावेदारीकडे सगळीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
Thank you for your support! Please go on https://t.co/Gb2t2vrh3L and vote for a #UNThatWorks. We the people are more powerful than any system. pic.twitter.com/nVzS6hYHuo
— Arora Akanksha (@arora4people) February 12, 2021