दिंडोरी – सध्याच्या विज्ञान युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही. पण तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसांपासून वीजेशिवायच असल्याची बाब समोर आली आहे.
तिसगाव हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव असून संपूर्ण गावासाठी एकच ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर सदोदित नादुरुस्त असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. कारण एवढ्या लोकसंख्येला तीन ट्रान्सफार्मर ची आवश्यकता असताना एकच ट्रान्सफार्मरवर ताण येतो. त्यामुळे नागरिकांना सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायत मार्फत वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन दिले पण वीज वितरण कंपनी कडून प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आज चार दिवसांपासून ग्रामस्थ पूर्ण अंधारात आहेत. ग्रामपंचायतीने वणी, दिंडोरी, नाशिक येथील विजवितरणाच्या कार्यालयात निवेदन दिले. पण अधिकारी जाणूनबूजून कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रश्न त्वरीत न सोडविल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सरपंच हिराबाई ढगे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वणीच्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो होऊ शकलेला नाही. संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनीही केली आहे.