पिंपळगाव बसवंत, ता. निफाड – सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने संपाचे हत्यार पुकारले होते. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कांदा व्यापारी असोसिएशनने बुधवारी (दि. ९) चालक-मालकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आंदोलकांनी संप मागे घेत व्यापारी असोसिएशनचे आभार मानले.
कांदा व्यापारी असोसिएशनकडून ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेला दर तीन वर्षांनी भाडेवाढ करण्याचे ठरले होते. डिझेलचा भाव ४५ रूपये असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात होते. सध्या डिझेलचा दर ८० रुपयांवर गेला असतानाही पुर्वीचेच भाडे व्यापारी असोसिएशन देत होते. त्यामुळे चालक-मालक संघटनेला मोठा तोटा सलागत होता.
७ सप्टेंबरपर्यंत भाडेवाढ करावी, अन्यथा संप पुकारण्याचा इशारा कांदा व्यापारी असोसिएशनला निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र, मागणी मान्य न झाल्याने मंगळवारी (दि. ८) चालक-मालकांनी संपाचे हत्यार उगारले. त्यानंतर मात्र, कांदा व्यापारी असोसिएशनने बुधवारपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संप मागे घेण्यात आला. सदर भाडेवाढ दोन वर्षांसाठी लागू आली असून, कमी अंतरासाठी ३००, तर जास्त अंतरासाठी ५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
या बैठकीला कांदा व्यापारी शंकर ठक्कर,सुरेश पारख, दिलीप मुथा, विशाल भंडारी उपस्थित होते.
मागण्या मान्य झाल्याने ट्रक-टेम्पो असोसिएशनचे पदाधिकारी शांताराम खरात, जगदीश कोठाळे, बाळासाहेब घुमरे, फईम सय्यद, राजू सय्यद, कैलास रिकामे, सचिन गिते, दौलत विधाते, अण्णा सोनगिरे, अरूण खैरनार, वसंतराव निकम, रामदास कोठुळे यांच्यासह असंख्य चालक, कामगारांनी कांदा व्यापारी असोसिएशनचे आभार मानले.
फेरी ठिकाण – जुने भाडे -नवीन भाडे
1) कुंदेवाडी- 1800 – 2100
2) खेरवाडी- 1800 – 2100 (टोल)
3) सुकेणा- 1800 – 2100 (टोल)
4) लासलगाव- 2800 – 3100
5) मनमाड- 3300 – 4500
6) येवला- 4000 – 4600
7) नगरसूल- 4500 – 5000
8) नाशिकरोड- 3000 – 3300 (टोल 140)
9) नांदगाव- 5000 – 5500
गेल्या सहा वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती. 45 रुपये डिझेलचा दर असताना जे भाडे मिळत होते तेच भाडे आता दिले जात होते. त्यामुळे आमचे नुकसान व्हायचे. मागणीप्रमाणे कांदा व्यापारी असोसिएशनने पूर्तता न केल्याने मंगळवारपासून संप पुकारण्यात आला होता. मात्र, बुधवारी कांदा व्यापारी असोसिएशनने मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला आहे.
– जगदीश कोठाळे, पदाधिकारी, ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटना