हैदराबाद तथा मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनाचा परिचय करुन देणारा हा विशेष लेख…
पहिल्या महायुद्धाच्या कालखंडातील ही घटना आहे, म्हणजे इ. स. १९१४ च्या सुमारास भारतीय स्वातंत्र्याची चळवळ वेग घेऊ लागली होती. त्याच काळात स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक यांचा झंझावाती दौरा सुरू होता. लहान-मोठ्या शहरात आणि खेड्यापाड्यात त्यांच्या सभा होत होत्या. त्याच वेळी लोकमान्य टिळक यांची सोलापूर शहरात सभा होणार होती. त्यामुळे शहरात स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण निर्माण झाले होते. अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारला होता. शहरातील नॉर्थकोट हायस्कूल या इंग्रजी (सरकारी) शाळेत विद्यार्थ्यांनी मात्र लोकमान्यांच्या सभेला जाऊ नये असा फतवा इंग्रज अधिकाऱ्यांनी काढला होता. इतकेच नव्हे तर सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर दर आठवड्याला या शाळेत भेट देऊन पहिल्या महायुद्धाच्या घटनांची माहिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देत असत. आणि या युद्धात इंग्लंड आणि मित्रपक्ष कसे बरोबर आहेत हे ठासून सांगितले जात असे, तद्वत टिळकांच्या सभेच्या आदल्या दिवशी मुलांना युनियन जॅकची (ब्रिटिशांचा राष्ट्रध्वज) प्रतिकृती आणि खाऊच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. यातील एका बाणेदार विद्यार्थ्याने युनियनजॅक फेकून दिला आणि खाऊचा पुडा देखील नाकाला. इतकेच नव्हे तर आपल्या मित्रांना देखील ब्रिटिशांचा झेंडा फेकून द्या असे त्याने सांगितले. त्याप्रमाणे अनेक मुलांनी हा झेंडा फेकून दिला. या कृतीबद्दल मुलांना मुख्याध्यापकांनी बेदम छड्या मारल्या. तसेच मुलांना टिळकांच्या सभेला जाऊ नये म्हणून मुद्दाम परिक्षेचे वेळापत्रक बदलून त्या दिवशी विज्ञानाच्या परीक्षेचा पेपर ठेवण्यात आला. तरी हा प्रमुख विद्यार्थी आणि त्याचे मित्र लवकर पेपर सोडवून लोकमान्य टिळकांच्या सभेला गेलेच. त्याबद्दल काही काळासाठी या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आले. परंतु त्याने याची पर्वा केली नाही. लोकमान्य टिळकांच्या भाषणाने स्वातंत्र्य चळवळीचे बीज या मुलाच्या मनात अधिक रुजले, किंबहुना त्याच्या देशभक्तीचा वृक्ष अधिकच बहरत गेला. कालांतराने इंग्रजांविरुद्ध लढा देत असतानाच देशातील एक मोठे जुलमी संस्थान खालसा करण्यात आणि तेथील लाखो जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करण्याचा बहुमान या मुलाला मिळाला. कोण होता हा मुलगा? ते होते, हैदराबाद तथा मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ…
सरकारी कागदपत्रानुसार स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ जन्मगाव निजाम संस्थानातील गुलबर्गा जिल्ह्यातील चिनमेली असल्याचे सांगण्यात येते. परंतु स्वामीजींचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याच्या गावी दि. ३ ऑक्टोबर १९०३ रोजी झाला. स्वामीजींचे वडील भवान खेडगीकर हे कर्नाटकात सिंदगी या गावी कानडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते. त्यामुळे स्वामीजींचे मूळ घराणे खेडगी येथील असून ते गाव विजापूर जिल्ह्यातील हंडी तालुक्यात आहे. स्वामीजी मुळ कानडी भाषिक असले तरी त्यांना मराठी भाषा चांगली अवगत होती. कालांतराने मराठी भाषिक प्रदेश हीच त्यांची कर्मभूमी राहीली. त्यांचे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते. उदरनिर्वाहासाठी त्यांचे नातेवाईक महाराष्ट्रात आले होते. मात्र स्वामीजींचा हैदराबाद संस्थानाशी लहानपणापासून संपर्क आला. याचे मुख्य कारण असे की त्यांच्या दोन भगिनी हैदराबाद संस्थानाला दिलेल्या होत्या. स्वामीजींचे प्राथमिक शिक्षण सिद्धी येथे ज्या शाळेत वडील मुख्याध्यापक होते तेथेच झाले. त्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण सोलापूर येथे झाले.
सोलापुरात शालेय शिक्षणाबाबत तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याचे विचार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मनात रात्रंदिवस सुरू होते. त्याच वेळी दि. १ ऑगस्ट १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले, त्या घटनेबद्दल स्वामीजी आपल्या आठवणींच्या संग्रहात लिहितात, लोकमान्य टिळकांचे निधन झाले, त्यादिवशी मी तळ्याकाठी बसून खुप खुप रडलो. आणि या क्षणापासून माझे पुढील जीवन पूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करीन, तसेच सर्वसंग परित्याग करून आजन्म ब्रह्मचारी राहील, तसेच मी तळ्यात अर्ध्य दिले आणि ध्यानमग्न झालो. तेव्हापासून त्यांचा पुढील जीवन प्रवाह बदलला. इथूनच पुढच्या काळात शालेय शिक्षणाऐवजी देशभक्तीचे विचार त्यांच्या मनात वारंवार येत असत.
व्यंकटेश तथा स्वामीजी हे हायस्कूल मध्ये एक चांगले विद्यार्थी होते, उत्तम अभ्यास करा, असे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना परोपरी सांगितले, परंतु स्वातंत्र्य चळवळीचे विचारच त्यांच्या मनात होते. त्याच दरम्यान महात्मा गांधी सोलापूर येथे आले असताना त्यांना बघायला व्यंकटेश रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांनी गांधीजींच्या चरणांना स्पर्श केला. त्यावेळी गांधीजी त्यांना म्हणाले, मोठे व्हा, देशासाठी काहीतरी करा. गांधीजींचे हे आर्शिवाद आणि मार्गदर्शन खरे ठरले. पुढे हैदराबाद (मराठवाडा) स्वातंत्र्य आंदोलनात प्रमुख नेता म्हणून स्वामीजीचे कार्य देशापुढे आले. जणू काही गांधीजींच्या नजिकच्या परिवारातील ते एक सदस्य बनले. वैयक्तिक सत्याग्रहासाठी गांधीजींनी हैदराबाद संस्थानाच्या ज्या पाच-सहा जणांची निवड केली, त्यात पुढे स्वामी रामानंद तीर्थ या नावाने प्रसिद्ध असलेले वेंकटेश हे पहिल्या क्रमांकावर होते.
दरम्यानच्या काळात कामगार चळवळीतील नेते ना. म. जोशी यांच्यासमवेत स्वामीजींनी काही काळ मुंबईतील कामगार चळवळीत काम केले. त्यानंतर ते मराठवाड्यात दाखल झाले. येथे काही काळ स्वामीजी हिप्परगा (जिल्हा उस्मानाबाद) येथील गुरुकुल निवासी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यावेळी त्यांना दरमहा मानधन होते पन्नास रुपये. परंतु पोटापुरते अन्न आणि अंगासाठी कपडे मिळाल्याने त्यांनी संस्थेत असेपर्यंत या मानधनाला हात लावला नाही, पुढे त्यांनी जमा झालेली ही सर्व रक्कम संस्थेला देऊन टाकली. याच काळात स्वामीजी यांनी दि. १४ जानेवारी १९३० रोजी स्वामी नारायण तीर्थ यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. त्यानंतर ते आंबेजोगाई येथे शिक्षण कार्यात सहभागी झाले. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला. याच काळात त्यांना आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, काशिनाथ वैद्य, अनंतराव भालेराव, लक्ष्मणराव नातू , दिगंबर बिंदू, रामचंद्रराव अंतू असे शेकडो सहकारी लाभले. याच काळात महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. स्वामीजींनी परिषदेचे सरचिटणीस पद देण्यात आले. हैदराबाद संस्थानात आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे मराठवाडा समाविष्ट होता. स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ जोर धरू लागल्याने महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली. स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हैदराबाद येथे राहून एकाच वेळी इंग्रज आणि निजामाविरुद्ध अशा दुहेरीपद्धतीने सुरू ठेवली. सत्याग्रह, संप, शासकीय कार्यालयावर मोर्चे अशा अनेक प्रकारे आंदोलन सुरू होते. मराठवाडा विभागासाठी आंदोलनाचे कार्यालय मनमाड येथे ठेवण्यात आले. याच काळात स्वामीजींना विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांनी सहकार्य केले. दि. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी हैदराबादच्या निजामाचे संस्थान स्वतंत्र भारतात सामील झाले नाही, त्यामुळे मराठवाड्यातील जनता अद्यापही पारतंत्र्यातच होती. आता स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा तीव्र केल्याने अनेकांना अटक करण्यात आली. अखेर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऍक्शन म्हणजे भारतीय लष्कर पाठवून हैदराबाद संस्थान बरखास्त केले. त्यामुळे दि. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादसह मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर स्वामीजी १९५२ आणि
१९५८ मध्ये अनुक्रमे गुलबर्गा आणि औरंगाबाद येथून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. त्यांचे पाच ते सहा भाषांवर प्रभुत्व होते. लोकसभेतील त्यांची अनेक भाषणे गाजली. खुद्द पंतप्रधान पंडित नेहरू यांचे भाषण ऐकण्यासाठी हजर असत. १९६० च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील देखील स्वामीजींचा सहभाग होता. १९६२ नंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर सुमारे दहा वर्षे शैक्षणिक व सामाजिक कार्यात मार्गदर्शन केले. अखेर दि. २२ जानेवारी १९७२ रोजी स्वामीजी अनंतात विलीन झाले.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)
अप्रतिम