मुंबई – प्रेमाला वय नसतं, याची प्रचिती देणारी घटना अलीकडेच आग्रा येथे घडली. एका ५० वर्षीय महिलेने पतीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले. अर्थात पाश्चात्य संस्कृतीत या घटनेचे आश्चर्य मानले जाणार नाही. मात्र भारतात अशा घटना दुर्मिळच.
आपल्या मुलांची लग्न लावल्यानंतर कुटुंब व्यवस्थेतून संन्यास घेत या महिलेने सहा महिन्यांपूर्वी तीर्थस्थळ गाठले होते. बटेश्वर या तीर्थस्थळी गेल्यानंतर एक महिन्यापूर्वी आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान संन्यासी बाबासोबत तिचे सूत जुळले. दोघांमध्ये ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे या महिलेने संन्यासी जीवनाचा त्याग करीत ४० वर्षीय प्रियकराशी लग्न केले आणि पुन्हा एकदा कुटुंब व्यवस्थेत पाऊल टाकले.
या महिलेच्या पतीचे निधन होऊन बरीच वर्षे झाली होती. त्यानंतर तिने मुलांचे पालन-पोषण करीत त्यांना वाढवले, शिकवले. त्यांची लग्न लावून दिली. मुलांची जबाबदारी सांभाळताना आयुष्य कसे निघून गेले हे देखील तिच्या लक्षात आले नाही. मात्र मुलं आपल्या संसारात रमायला लागल्यानंतर तिच्याकडे कुणी लक्ष देत नव्हते. त्यातून तिला एकाकीपण आले. नातवंडही दुरावल्याने आजीचे मन खट्टू झाले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी तिने तीर्थस्थळ बटेश्वर गाठले.
तिथे ती इतर संन्यासी बाबांसोबत एका टीनाच्या शेडमध्ये राहू लागली. या वातावरणात ती चांगलीच रमायला लागली. एक महिन्यापूर्वी इटावा येथील रहिवासी असलेला ४० वर्षीय बाबा तिथे राहायला आला. तो अविवाहित होता आणि घर-कुटूंब त्यागून तिथे आला होता. तो या महिलेच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊ लागला.
जेवणाची व्यवस्था करण्यापासून आजारपणातही सांभाळू लागला. त्यामुळे दोघेही जवळ आले. त्यानेच तिला एक दिवस प्रपोज केले आणि तिने होकारही दिला. थोड्याच दिवसांत दोघांनी देवळात लग्न केले आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. तीर्थस्थळ बटेश्वर येथे या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. अशापद्धतीचे लग्नही इथे पहिल्यांदाच पार पडले.
संन्यासी ठरले साक्षीदार
गंमत म्हणजे गृहस्थ जीवनाचा त्याग करून सन्यास घेतलेले लोकच या दोघांच्या लग्नाचे साक्षीदार ठरले. एका टीनच्या शेडखाली राहणारे सर्व सन्यासी बाबा लग्नाला हजर होते. या साऱ्यांनी नव्या जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.