त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर येथे शनिवार दिनांक ६ फेव्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने काही भागात संचारबंदी लागु करण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी शुभम गुप्ता यांनी घेतला आहे. कोविड – १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनीयम १८६७, सार्वजनीक आरोग्य विभाग अधिसुचना १४ मार्च २०२० यांच्या आधारे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे संचारबंदी लागु करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील या भागात आहे संचारबंदी
संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर, त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसर, कुशावर्त तीर्थ व परिसर, संगम घाट परिसर, गजानन महाराज संस्थान परिसर जव्हार फाटा, स्वामी समर्थ केंद्र परिसर, चौकीमाथ परिसर, हनुमान मंदिर, गंगाद्वार पायथा, एमटीडीसी रिसोर्ट जवळ, बस स्थानक परिसर या ठिकाणी शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ ते सोमवार दिनांक ८ फेबुवारी २०२१ चे रात्री १२ वाजे पर्यंत संचारबंदी लागु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहराच्या सर्व भागात कर्फ्यु नाही
त्र्यंबकेश्वर शहरात बॅरेकेटींग करून वाहतुक नियंत्रीत केली जाणार आहे. तर खासगी लॉजींग, हॉटेल व इतर ठिकाणी येणा-या यात्रेकरूंच्या मुक्कामावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शहराच्या सर्व भागात कर्फ्यु नसला तरी देखील एकुण नियोजन पाहता संपुर्ण कर्फ्यु सदृष्य स्थिती निर्माण होणार असल्याने नागरिकांना हे तीन दिवस जिकरीचे जाणार आहेत. शनिवार रविवार शासकीय सुटी असल्याने तशी फारशी गैरसोय होणार नाही मात्र सोमवारी नोकरदारांना कामानिमीत्त बाहेर जाणे आणि शहरात येणे अवघड ठरणार आहे. विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसणार आहे.
तीन दिवस दुकाने बंद राहतील असे नियोजन
त्र्यंबकेश्वर शहरातील धार्मिक पुजा विधी देखील या कालावधीत करणे कठिण होणार असून बहुसंख्य पुरोहितांनी मुक्कामाची आवश्यकता असलेल्या आणि संगमघाटावर होत असलेल्या पुजा विधी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायीकांनी देखील तीन दिवस दुकाने बंद राहतील अशा पध्दतीने पुर्व नियोजन सुरू केले आहे.