चांदवड तालुक्यातील शिरसाणे ग्रामपंचायतीचा व्दितीय तर निफाड तालुक्यातील शिवडी व बागलाण तालुक्यातील नवे निरपूर ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांक विभागून
नाशिक – संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत २०१९-२० मधील ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव ग्रामपंचायतीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. चांदवड तालुक्यातील शिरसाणे ग्रामपंचायतीचा व्दितीय तर निफाड तालुक्यातील शिवडी व बागलाण तालुक्यातील नवे निरपूर ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांक विभागुन देण्यात आला. तीन विशेष पुरस्कारही जाहिर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुरस्कार विजेच्या गावांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबिविण्यात येत आहे. ग्रामस्थांत स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. या अभियानाला स्वच्छ भारत अभियानाची जोड मिळाल्याने गाव हागणदारीमुक्त झाली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरूस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुध्दता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्हयातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रथम आलेल्या एकुण ७३ ग्रामपंचायतींची तपासणी करुन त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या २० ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून पडताळणी करण्यात आली. यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभाग आणि सामुहीक स्वयंपुढाकारातुन नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यात येऊन या निकषाच्या आधारे ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुरस्कार विजेच्या गावांचे अभिनंदन केले आहे.
विशेष पुरस्कारही जाहिर
या अभियानांतर्गत तीन विशेष पुरस्कार दिले जातात. यात नाशिक तालुक्यातील कोटमगाव ग्रापंचायतीला पाणी गुणवत्ता आणि व्यवस्थापन करिता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, पेठ तालुकयातील हनुमान नगर ग्रामपंचायतीला सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार तर इगतपूरी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीला शौचालय व्यवस्थापनासाठीचा स्व.अप्पासाहेब खेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हयाने स्वच्छता अभियानात सातत्याने चांगली कामगिरी केली असून जिल्हयातील अनेक गावांनी आदर्श गावांकडे वाटचाल सुरु केली आहे. यापूवीदेखील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २०१७-१८ या वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यातील अवनखेड (ता. दिंडोरी) या ग्रामपंचायतीला विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर राजदेरवाडी (ता. चांदवड) या ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच याच वर्षी राज्यस्तरावर अवनखेड ग्रामपंचायतीला विशेष पारितोषिक मिळालेले आहे. सन २०१८-१९ मध्ये लोखंडेवाडी, ता. दिंडोरी, ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक तर शिरसाणे, ता. चांदवड ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्हयातील अन्य गावांनीही सहभागी व्हावे- बाळासाहेब क्षिरसागर
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे अभिनंदन. लोकसहभागातून राबविण्यात येणा-या या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अतिशय उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन ग्रामविकासाचा पाया मजबूत केला आहे. जिल्हयातील अन्य गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या यांनीही स्वच्छतेतून समृध्दीकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.
ग्रामपंचायतीना काम करण्याची संधी – लीना बनसोड
स्वच्छता अभियानात नाशिक जिल्हयाने चांगले काम केले आहे. नुकताच केंद्र शासनाकडून याबाबत नाशिक जिल्हयाचा सन्मानही झाला आहे. पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन आणि लोकसहभाग या चतु:सुत्री प्रमाणे गावाने एकजुटीने काम केल्यास आदर्श गावाकटे वाटचाल करण्याची क्षमता सर्व ग्रामपंचायींकडे आहे. स्पर्धा मोठी असल्याने जिल्हयातील ग्रामपंचायतींना यामध्ये काम करण्याची संधी आहे. पुढील वर्षी जास्तित जास्त गावांना यामध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.