माघ वद्य सप्तमी दिवशी संत गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस ५ मार्च रोजी आला आहे. यानिमित्त आपण या दिनाचे महात्म्य जाणून घेणार आहेत………
अवघ्या विश्वाला गणगण गणात बोते हा मंत्र देणाऱ्या महान संत वेदशास्त्रसंपन्न योगी श्री गजानन महाराज यांचे प्रथम प्रकट दर्शन १८७८ मध्ये माघ वद्य सप्तमी दिवशी मध्यान प्रहरात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झाले. येथील पातुरकरांच्या घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रमात मधील जेवणावळीच्या उष्ट्या पत्रावळी समोरील झाडाखाली टाकलेल्या होत्या. त्या पत्रावळी वरील उष्टे अन्न खात बसलेले संत गजानन महाराज हे प्रथम बंकटलाल अग्रवाल व दामोदर पंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडले. म्हणून हा दिवस संत गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून संपूर्ण जगभरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा केला जातो.
महाराजांचे एकूणच तेजपुंज व्यक्तिमत्त्व व हावभाव पाहून हे कोणीतरी महान योगी साधुसंत आहेत याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी पातुरकरांच्या घरून मिष्टान्न भोजनाचे ताट वाढून आणून महाराजांपुढे ठेवून त्यांना खाण्याची विनंती केली. महाराजांनी त्या ताटातील सर्व पदार्थ एकत्र करून खाण्यास सुरुवात केली. जेवण झाल्यावर येथील गडूळ पाणी पिऊन टाकलं जणू काही चांगले वाईट हे फक्त आपल्या मनाचे खेळ असून परमेश्वर निर्मित सर्व चांगलेच आहे, असा संदेश महाराजांनी आपल्या कृतीतून दिला.
या संत पुरुषांची आपण विचारपूस करावी पाया पडून दर्शन घ्यावे, या उद्देशाने बंकटलाल दामोदर पंत महाराजांच्या जवळ जाण्याअगोदरच महाराज तेथून निघून गेले. बंकटलाल याने महाराजांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तहान भूक विसरून ते महाराजांचा शोध सर्व परिसरात घेत फिरत होते.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाची नासाडी करू नये. ताटात वाढलेले पूर्ण अन्न भक्षण करावे, असाही संदेश महाराजांनी आपल्या कृतीतून दिला. पुढे शेगाव हीच आपली कर्मभूमी ठेवून संत गजानन महाराज यांनी आपल्या लाखो भक्तांना आपल्या योगिक सामर्थ्याच्या असंख्य अनुभूती दिल्या. मिष्टान्न भोजनाचा बडेजाव न करता भाकरी, पिठलं व कांदा अशा सर्व सर्वसामान्यांच्या आहारास महाराजांनी कायम प्राधान्य दिले. आजही लाखो भक्त पिठलं, भाकरी व कांदा हाच नैवेद्य महाराजांना अर्पण करतात.
खरा भक्तिमार्ग सेवा मार्ग काय असतो हे महाराजांनी शिकवले. भास्कर पाटील, बंकटलाल अग्रवाल, दामोदर कुलकर्णी, भक्त जानराव जानकीराम, चंदू मुकीन, गणू जवऱ्या, हरी पाटील, ब्रह्मगिरी हरिदास टाकळीकर, भक्त बाळकृष्ण सुकलाल, लक्ष्मण घूडे, भक्त पितांबर गंगाभारती, भक्त पुंडलिक माधवनाथ, भक्त कवर, भक्त बाईजा बाई, भक्त बापूना यासह लाखो भक्तांना संत गजानन महाराजांची कृपादृष्टी लाभली.
भक्तांच्या उद्धारासाठी शेगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक, ओंकारेश्वर, नागपूर, पंढरपूर यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या भक्तांनाही महाराजांचा प्रत्यक्ष सहवास व कृपादृष्टी लाभली. महाराजांच्या योगिक सामर्थ्याची अनुभूती देखील अनेक प्रसंगांमधून भक्तांनी अनुभवली.
भक्तिमार्ग, धार्मिकता, सेवाभाव, वेदशास्त्र त्याचप्रमाणे अन्नपूर्णेच्या महात्म्याचा गण गण गणात बोते हा गुरुमंत्र आपल्या जगभरातील लाखो भक्तांना देऊन भक्तांच्या हृदयात आजन्म स्थान मिळवले. हे महान योगी संत गजानन महाराज ८ सप्टेंबर १९१० ऋषिपंचमी या दिवशी शेगाव येथे समाधिस्थ झाले.
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान आणि त्यांची भारतभरातील सर्व मंदिरे ही भक्तीभाव व सेवाभाव याचा लाखो भक्तांसाठी एक आदर्श म्हणून कार्यरत आहेत….
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!