माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मागणी
मुंबई – हवामानातील बदलामुळे होणाऱ्या संत्रा गळतीमुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या गळतीवर प्रतिबंध करण्याकरिता कृषी विभागाने व कृषी विद्यापीठने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी माजी कृषिमंत्री, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
संत्रा विदर्भातील महत्वाचे फळ असून अमरावती जिल्ह्यामध्ये ५० हजार हेक्टर जमीनीवर संत्रा लागवड आहे. यावर्षी मृग बहार अतिशय तुरळक प्रमाणात आला आहे. मात्र, आंबिया बहार मोठ्या प्रमाणात आला असून शेतकऱ्याच्या उत्पादनांची भिस्त या आंबिया बहारावर आहे. तिवसा तालुक्यातील मोझरी, मोर्शी-वरुड तालुका, अचलपूर, चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांनी संत्राच्या फळ गळतीची तक्रार केली आहे. परंतु अद्यापपर्यंत शासनाने याची दखल घेतलेली नाही. संत्रा हे नगदी पिक असून शेतकऱ्यांना हाताशी आलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणावर गळती होताना पाहावी लागत आहे. कृषी अधिकारी संभ्रमात असल्याने त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या या उत्पादनाला मुकावे लागणार या विवंचनेत शेतकरी अडकलेला आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी तातडीने पाहणी करून उपाय योजना करावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच जिल्हाधिकारी यांनी संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे.