नाशिक – सध्याच्या शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्यपूर्ण आहाराकडे तरुणांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपली स्वप्ने, इच्छा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक सुजाण नागरिक म्हणून आपण समाजाचे देणे लागतो. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि नियंत्रित जीवनशैली हे निरोगी आयुष्याचे चार प्रमुख स्तंभ असल्याचे मत ख्यातनाम कॉर्पोरेट कीर्तनकार कथा लेखक, उद्योजक पुष्कर औरंगाबादकर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ख्यातनाम कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांचे ‘लाइफ कोच तुकोबा – एक कॉर्पोरेट कीर्तन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांपर्यंत कसे पोहोचायचे, कॉर्पोरेट आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड कसे द्यायचे, कामातून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून मुक्त कसे व्हायचे, यश-अपयश आणि आनंदाची सांगड कशी घालायची आणि आपल्या कामातील कार्यकारणभाव कसा ओळखायचा अशा निरनिराळ्या गोष्टींवर भाष्य केले. सध्याच्या व्यावहारिक जगामध्ये अनेक समस्यांचे निराकरण कीर्तनाद्वारे करता येऊ शकते. असे कॉपरेरेट कीर्तन अनुभवण्याची संधी नाशिककरांना यानिमित्ताने मिळाली.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजातील सामान्य माणसाला धैर्य आणि शौर्याची शिकवण देत कीर्तनकारांनी आजवर प्रबोधनाचे काम केले. कीर्तनामध्ये नारदीय, रामदासी, नाथसंप्रदाय आणि वारकरी कीर्तन अशा वेगवेगळय़ा परंपरा आहेत. पूर्वरंगामध्ये तत्त्वज्ञानाच्या आधारे विषयाची सोप्या भाषेत मांडणी करून उत्तररंगामध्ये रामायण, महाभारत अशा कीर्तन शैलींचा अभ्यास प्रात्यक्षिकांतून उलगडताना श्रोत्यांना खिळवून ठेवणारे विवेचन पुष्कर औरंगाबादकर यांनी आपल्या रसाळ वाणीद्वारे केले. गेल्या तब्बल नऊ पिढय़ांची कीर्तन परंपरा असलेल्या औरंगाबादकर घराण्यातील पुष्कर यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, कॉर्पोरेट कीर्तन हे विविध आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सादर केले जात असून, देशाच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचं चरित्र संतांच्या रचनांमधून कथित करणे हा कॉर्पोरेट कीर्तनाचा मुख्य गाभा आहे. याशिवाय इतर कीर्तनकारांच्या शैलीचा अभ्यास हा अभ्यास म्हणून केला जात असून स्पर्धात्मक पातळीवर नेलेली कला ही लवकर लोप पावते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम समितीचे प्रमुख हेमंत मराठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता मंथ लिडर कपिल पाटील आणि स्मिता अपशंकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सचिव प्रफुल बरडीया यांनी आभार मानले.