अमृतसर (पंजाब) – भाजपच्या आमदाराला मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे संतप्त शेतकऱ्यांच्या समुहानं मारहाण केली असून, त्यांचे कपडेही फाडण्यात आले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आमदार अरुण नारंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून कारवाईचा इशारा दिला आहे. राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस, भाजपसह शिरोमणी अकाली दलानं या घटनेचा निषेध केला आहे.
अबोहरचे आमदार अरुण नारंग मलोट हे पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी गेले होते. त्या पत्रकार परिषदेला शेतकऱ्यांचा विरोध होता, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिस उपाधिक्षक जसपाल सिंग म्हणाले की, तैनात असलेल्या पोलिसांनी नारंग यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. काही लोकांनी बुक्क्यांनी मारहाण करून शाई फेकली असा आरोप नारंग यांनी केला.
काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आमदारांसह स्थानिक नेत्यांना एका दुकानात नेलं. परंतु ते बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कथितरित्या नारंग यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. शेतकऱ्यांच्या तावडीतून नारंग यांची सुटका करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले.
भाजपच्या आमदारांना पत्रकार परिषद घेऊ देणार नाही, यावर शेतकरी ठाम होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये आमदारांचे कपडे कथितरित्या फाटलेले असून, पोलिस त्यांना सुरक्षित स्थळी नेत आहेत, असं दिसत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकर्यांना हिंसाचार न करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.