बागलाण – तालुक्यातील केरसाणे येथे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी दौरा करणारे आमदार दिलीप बोरसे यांना संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याची बाब समोर आली आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनंतर आमदारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
आमदार बोरसे हे नुकसानीची पाहणी करून केरसाणे ग्रामपंचायत कार्यालय जवळ आले. तेथे शेतकरी वर्गाशी संवाद साधत होते. त्याचवेळी काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आमदार दिलीप बोरसे यांना डांबून ठेवले. शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. आम्ही तुम्हाला याच्यासाठी विधानसभेत पाठवले का, तुम्ही काय करतात, असे प्रश्नांना भडिमार आमदारांवर सुरु केला.
एकीकडे शासन वीज कनेक्शन तोडत आहेत. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आपण करतात काय असा सवाल उपस्थित करून संतप्त शेतकऱ्यांनी आमदारांना डांबून ठेवले.
आम्हाला गेल्या अवकाळी पावसाची तसेच पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. वीज कनेक्शन तोडणी बंद करावी. ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहेत त्यांचे कनेक्शन पूर्ववत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
कुणाचेही वीज कनेक्श तोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार बोरसे यांनी दिली. तसेच, शासनाकडे सर्व मागण्यांसाठी ठोस पाठपुरावा करु. मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे आमदारांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला. त्यानंतर आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर काढण्यात आले.
याप्रसंगी सरपंच फुलाबाई माळी, उपसरपंच संजय अहिरे, स्थानिक ग्रामस्थ हरिभाऊ मोरे, बाळासाहेब मोरे, बारकू अहिरे, आमलक मोरे, कांतीलाल सोनवणे, विनोद अहिरे, लक्ष्मण अहिरे आदी उपस्थित होते.
पुन्हा पाहणी दौरा
ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर येताच आमदार बोरसे यांनी परिसरातील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या परिसरात त्यांनी जवळपास २ ते ३ तास पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा समजून घेतल्या. तसेच, नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना बोरसे यांनी तहसीलदार जितेंद्र पाटील यांना केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!