दिंडोरी – सतत चालू असणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील टोमॅटो पिकाला धोका निर्माण झाला आहे. करपा,बुरशी, इ.रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आढळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
पश्चिम पट्ट्यात जास्त प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते. यंदा कोरोनामुळे नर्सरीमध्ये बुकिंग करून ही टोमॅटो रोपे मिळत नसल्याने बळीराजांला टोमॅटो पिक घेण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली. मिळेल त्या ठिकाणाहून टोमॅटो ची रोपे उपलब्ध करून नागपंचमीची टोमॅटो लागवड शेतकरी वर्गाने केली. अत्यंत महागडे किंमतीचे बियाणे, औषधे फवारणी करीत टोमॅटो पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने कष्ट घेतले. नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिले जाते. भरपूर भांडवल खर्च करून टोमॅटो पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने मेहनत घेतली. संततधार पावसाने अर्ली व नुतन लागवड केलेल्या टोमॅटो पिकावर संक्रांत आली आहे. पिकावर करपा बुरशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. भीज पावसाने आरली टोमॅटोची फुलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
—
सध्या टोमॅटो पिकाकडे आम्ही सर्व लक्ष केंद्रित केले आहे. पण पिकावर करपा, व्हायरस, बुरशी, फुलकळी कुजण्याचे प्रमाण, सुकवा आदींचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे टोमॅटो पीक धोक्यात आहे.
संदीप मोगल, टोमॅटो उत्पादक, लखमापूर
—