मुंबई – वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगीन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.
राठोड अडचणीत येणार
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विविध आरोप होत असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते जणू अज्ञातवासात होते. गेल्या काही दिवसात ते प्रथमच सर्वांसमोर आले. पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने कारवाई सुरू केली तर राठोड समर्थकांवर गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत.
#WATCH | Crowd gathers as Maharashtra Minister Sanjay Rathod's convoy reaches Pohradevi temple in Washim district; police baton-charge to disperse them. #COVID19 pic.twitter.com/Mh479pV6Fh
— ANI (@ANI) February 23, 2021