मुंबई – ‘राजा’ चित्रपटाच्या निमित्ताने संजय कपूर आणि माधुरी दीक्षित – नेने एकत्र आले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर जवळपास २५ वर्षांनी नेटफ्लिक्सवरील एका वेबसिरीजच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येणार आहेत. सध्या त्याचे नाव ‘ऍक्ट्रेस’ असे असल्याचे समजते. याचे शुटींग नाशिकमध्ये सुरू आहे.
‘ऍक्ट्रेस’ ही रहस्यमय सिरीज असून कोणताही माग न ठेवता एक सुपरस्टार गायब होण्याची कथा यात रंगवण्यात आली आहे. ही प्रमुख भूमिका संजय कपूर करणार असल्याचे कळते.
यासंदर्भात संजय कपूरने सांगितले आहे की, मी ऑक्टोबर पासून नाशिकमध्ये शूटिंग करतो आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझे काम पूर्ण होईल. २०२० हे वर्ष काही चांगले गेले नाही. पण मी सकारात्मकता जपणारा माणूस आहे. आणि आता सेटवर परत येऊन मला फारच आनंद होत असल्याचे संजय कपूर याचे म्हणणे आहे. अर्थात त्याने या सिरिजबद्दल आणि आपल्या भूमिकेबद्दल आणखी काही सांगण्यास नकार दिला. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक श्री राव यांनी मार्चमध्ये याचे शूटिंग सुरु केले होते. पण कोरोनामुळे त्यांना शूटिंग थांबवावे लागले. ते नुकतेच ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरु झाले.
नव्याने सुरुवात झाल्यावर सर्वानी पीपीई किट तसेच मास्क घालूनच शूटिंगला सुरुवात केली. याशिवाय त्यांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हलही दररोज तपासली जात असल्याचे राव यांनी सांगितले. याचबरोबर सर्वांची कोरोना तपासणी देखील करण्यात आली आहे.