मुंबई – अभिनेता संजय दत्त याची मुलगी, त्रिशाला ही मानसोपचारतज्ज्ञ आहे. इंस्टाग्रामवर एकाने तिला तिच्या वडिलांच्या ड्रग्सच्या सवयींबद्दल विचारलं. त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिलं आहे. ती म्हणते, ऍडिक्शन हा फार मोठा आजार आहे. त्याची इच्छा असह्य झाली की तुम्ही ड्रग्स शोधायला लागता. त्याचा परिणाम जरी वाईट असला, तरी एकदा सवय लागली की, त्याचे सेवन रोखणे हे खूप कठीण असते. त्यामुळे हा एक आजार आहे, हे जाणून त्यावर उपाय करणे खूप आवश्यक आहे. तसेच त्यावरील उपचारांमध्ये सातत्य गरजेचे आहे.
ड्रग्स घेण्याची सुरुवात कोणीही आपल्या मर्जीनेच करतो. पण, सातत्याने ते घेण्याने तुमच्या डोक्यातही बदल होऊ लागतात. आणि तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. डोक्यात झालेले हे बदल बराच काळ टिकतात त्यामुळेच ड्रग्सची सवय लवकर सुटत नाही. आणि काही काळानंतर तर ही तुमची गरज बनते. त्यामुळेच ज्यांनी ही सवय मुश्किलीने सोडवली आहे, ते देखील अचानक याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना खरोखरच ही सवय सोडवायची आहे, त्यांना आधाराची गरज असते, असे त्रिशाला सांगते.
माझ्या वडिलांनी बऱ्याच प्रयत्नांनी ही सवय सोडवली, याचा मला अभिमान वाटतो. संजय दत्त अमेरिकेत एका पुनर्वसन केंद्रातही राहिला आहे. आपल्या ड्रग्सच्या सवयींबाबत तो नेहमीच मोकळेपणाने बोलतो. त्याच्यावरील बायोपिक संजू मध्येही या गोष्टीचा उल्लेख आहे. त्रिशाला हिची ही पोस्ट इंस्टाग्रामवर पाहता येईल.