करी दिन म्हणजे काय?
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत अर्थात करी दिन म्हणून साजरा केला जातो. ही पूर्वापार प्रथा आहे. संक्रांत देवीने किंकर या राक्षसाचा वध आजच्या दिवशी केल्याने आजच्या दिवसाला किंक्रांत नाव पडले आहे, अशी अख्यायिका आहे. करी दिन म्हणजे अशुभ दिवस, अशी पूर्वापार मान्यता आहे. असे सहा प्रकारचे करी दिन असतात, असा शास्त्रार्थ आहे.
हे अशुभ दिवस पुढील प्रमाणे
पहिला करी दिन म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस. यास संक्रांत करी दिन असे म्हणतात. दुसरा करी दिन हा सूर्य अथवा चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी पाळला जातो. याला ग्रहण करी दिन असे म्हणतात. तिसरा करी दिन हा फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळीच्या दुसऱ्या दिवशी पाळला जातो. त्यास हुताशनी करी दिन असे म्हणतात. चौथा करी दिन हा सूर्याचे दक्षिणायन किंवा उत्तरायण सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पाळला जातो. म्हणजेच २२ जून आणि २३ डिसेंबर हे दिवस होत याला अयन करी दिन असे म्हणतात. पाचवा करी दिन हा आपल्या रक्ताच्या नातेवाईकांपैकी कुणाचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार केल्याच्या दुसर्या दिवशी करी दिन पाळला जातो. तर सहावा करी दिन म्हणजे वैशाख अमावस्या अर्थात शनिष्चर जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होय.
करी दिनाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य अथवा शुभ कार्यास सुरुवात करत नाहीत. या दिवशी कुणाशीही वाद घालू नये. वाद होऊ नये याची काळजी घ्यावी. संक्रांत करी दिनाच्या दिवशी तिळगुळ वाटप करत नाहीत. कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात करत नाहीत, असा प्रघात आहे. नंतर मात्र रथसप्तमी पर्यंत तिळगुळ वाटप केला जातो. याच काळामध्ये महिलांचे हळदी-कुंकू समारंभ व वाण देण्याची प्रथा आहे. यंदा रथसप्तमी १९ फेब्रुवारी रोजी आहे.
पंच ग्रहयोग
यावेळच्या मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे पंच ग्रह हा योग. मकर राशीमध्ये सूर्य, गुरु, शनि, बुध, चंद्र यांचा एकाच दिवशी प्रवेश होत असल्याने पंच ग्रहयोग. यातील गुरु नीचेचा तर शनी स्वराशीचा त्यामुळे अशुभ राजयोग. तर सूर्य बुध युतीमुळे बुधारित्य योग होतो. गुरु चंद्र युतीमुळे गजकेसरी योग होतो. शनी चंद्र युतीमुळे विष योग होतो. तर रवी आणि शनी हे विरूद्ध ग्रह एकत्र आल्याने काही मोठ्या अनपेक्षित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना घडण्याचा संभव असतो. त्याचे संमिश्र असे परिणाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवू शकतात.