नाशिक- योग मार्गदर्शक व सायकलिस्ट नंदू देसाई आणि त्यांचे कुटुंबिय नववर्ष दिनी म्हणजेच १ जानेवारीला सलग १२ तास सायकलिंग करणार आहेत. प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सायकल चालवावी असा त्यांचा आग्रह असून या प्रचार आणि प्रसारासाठीच ते हा उपक्रम करणार आहेत. नंदू देसाई आणि त्यांचे बंधू मोहन तसेच गौरव आणि यश ही मुले एकच सायकल रिले पद्धतीने चालवणार आहेत. नंदू देसाई हे भाजपाचे पदाधिकारी तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक व पदाधिकारी आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी सायकल चालवावी, असा संदेशही ते देणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून ते गोल्फ ग्राऊंड पासून सुरुवात करतील. त्यानंतर
एबीबी सर्कल, जेहान सर्कल, अशोक स्तंभ, नवीन सीबीएस मार्गे पुन्हा गोल्फ ग्राउंड या मार्गावर ते सायकलिंग करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता ते सायकलिंगचा समारोप करणार आहेत.