नाशिक – लाखो वारकरी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचा कारभार मंगळवारी प्रशासकीय समितीने स्वीकारला यानिमित्ताने झालेल्या बैठकीत आगामी वारीचे नियोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या सूचना पाळून वारकरी भाविकांना वारी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या विश्वस्तांची मुदत संपल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, एडवोकेट भाऊसाहेब गंभीरे, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक रणदिवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव यांची समिती निवडण्यात आली आहे. या समितीने माजी अध्यक्ष पवन भुतडा, विश्वस्त संजय धोंडगे, धनश्री हरदास, जयंत गोसावी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
पदाभार स्विकारल्यानंतर वारीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार मानाच्या दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक दिंडीत कमाल वीस वारकऱ्यांचा समावेश असावा अशी सूचना यावेळी करण्यात आली. याबरोबरच निवृत्तीनाथांची नित्य प्रासंगिक पूजा नेहमीप्रमाणे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत प्रशासनाने मंदिर परिसरात परवानगी शिवाय प्रवेश करण्यास बंदी केल्याने याबाबतचे नियोजन कसे करावे यावरही चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हा प्रशासनाने ही विश्वस्तांची बैठक घेतली यावेळी शहरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
श्री निवृत्तीनाथांचा यात्रोत्सव ७ व ८ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचना पाळून वारकरी भाविकांना वारी करण्याचे आवाहन अॅड. भाऊसाहेब गंभीर यांनी केले (बघा VDO)