नाशिक – लाखो वारकरी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानसाठी धर्मादाय सह आयुक्त जयसिंग पा. झपाटे यांनी चार फिट पर्सन्स सदस्यांची अर्थात प्रशासकीय समिती समिती नेमली आहे. संस्थानच्या कायदेशीर विश्वस्तांची नियुक्ती होईपावेतो ही समिती कारभार पाहणार असून आगामी यात्रोत्सवाचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. दरम्यान न्यासाच्या विश्वस्तपदांच्या नियुक्तीसाठी आयुक्तांनी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.
श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाची विहीत मुदत संपुष्टात आल्याने नवीन विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र दरम्यानच्या काळात श्री निवृत्तीनाथांचा यात्रोत्सव ७ व ८ फेब्रुवारी रोजी होत असल्याने या निमित्ताने नियोजन करण्यासाठी फिट पर्सन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशानुसार सहायक धर्मादाय आयुक्त के.एम. सोनवणे, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व त्र्यंबेकेश्वरचे पोलिस निरीक्षक यांना संस्थानच्या कारभाराची जबाबदारी दिली आहे. त्यांनी यात्रेचे नियोजन करावयाचे असून संस्थानचा कारभारही नवीन विश्वस्त नियुक्ती होईपावेतो पहायचा आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सुभाष हळदे हे सहाय्यक असतील.
विश्वस्तपदासाठी नव्याने मुलाखती
दरम्यान संस्थानच्या नऊ विश्वस्तपदासाठी नव्याने मुलाखती होणार असून त्यासाठीचा कार्यक्रमही धर्मादाय सह आयुक्त झपाटे यांनी जाहीर केला आहे. संस्थानच्या विश्वस्तपदासाठी नव्याने मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
राजकीय दबाव आणल्यास अपात्र ठरविणार
संस्थानच्या नवीन नियुक्त्यांचा कार्यक्रम जाहीर करतानाच राजकीय दबाव आणल्यास अपात्र ठरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता उमेदवारांना गुणवत्तेवरच नियुक्ती प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
प्रशाननाचे नियम पाळुन यात्रोत्सव करु
धर्मादाय सह. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रशासनाचे नियम पाळुन यात्रोत्सव साजरा करु, वारक-यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
अॅड. भाऊसाहेब गंभीरे