श्री दत्त जयंती महात्म्य आणि पूजा
– पंडित दिनेश पंत
श्री दत्तजयंती ही मार्गशीर्ष चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. ही तिथी उद्याच म्हणजे २९ डिसेंबर मंगळवारी आहे. या दिवशी दुपारी बारा वाजता दत्तमंदिरामध्ये श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील श्री क्षेत्र गाणगापूर श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र औदुंबरवाडी, श्रीक्षेत्र माहूर त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील देवगड तसेच अन्य सर्व दत्तमंदिरात दत्त भक्तांच्या प्रचंड जल्लोषात दत्त जयंती साजरी केली जाते.
गुरुचरित्र पारायण महात्म्य
श्री दत्त जयंतीच्या अगोदर आठ दिवस लाखो दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करतात. या पारायणाचे नियम पाळणे अतिशय आवश्यक असते. या सप्ताहात काहीजण संपूर्ण उपवास धरतात तर काहीजण मौनव्रत पाळतात. घराची अथवा गावाची वेस ओलांडत नाहीत. उद्यापन दत्तजयंतीच्या दिवशी केले जाते.
जयंती सोहळा
दत्त जन्मोत्सव सोहळ्यात सुशोभित असा पाळणा दत्त प्रतिमा ठेवून हलवला जातो. अनेक घरांमधून या सप्ताहात नवनाथ पारायण देखील केले जाते.
अशी आहे जन्मकथा
दत्त जयंती निमित्ताने होणाऱ्या कीर्तनामध्ये पुढीलप्रमाणे श्री दत्त जन्म कथा सांगितली जाते. अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिची दानशूरता आणि देवभक्ती त्यावेळी त्रिखंडात गाजत होती. तिची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी गेलेल्या साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश यांनाच अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखून त्यांचे बालकात रूपांतर केले. असे ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप बालक (तीन शिरे सहा हात) म्हणजेच श्री गुरुदेव दत्त होय. श्री गुरुदेव दत्त यांना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असे म्हटले जाते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा नामघोषाने दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.