नवी दिल्ली – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी देशभरातून जवळपास १० कोटी घरांमधून अडीच हजार कोटींहून अधिक समर्पण निधी जमा झाला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, एप्रिलमध्ये मंदिर बांधण्यासाठी पायाभरणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. सध्या निर्माण स्थळी पाया बांधण्यासाठी खोदण्याचे काम आणि मातीचा ढिगारा हटवण्याचं ६० टक्के काम झाले आहे.
समर्पण निधी अभियान पूर्ण झालं असलं तरी जे भाविक समर्पण निधी देण्यापासून वंचित राहिले असतील ते श्रीराम जन्मभूमी क्षेत्र न्यासाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून समर्पण निधी जमा करू शकतात, अंस चंपत राय म्हणाले.
मंदिरासाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रातून समर्पण निधी मिळाला आहे. ४ मार्चपर्यंत समर्पण निधी २५०० कोटीहून अधिक जमा झाला आहे. शेवटचे आकडे येणं बाकी आहेत. ईशान्येकडील राज्यातूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, असं त्यांनी सांगतिलं.
चार लाख गावांचं लक्ष्य पूर्ण
समर्पण निधी अभियानाचा उल्लेख करताना श्री. राय म्हणाले, जवळपास चार लाख गावांचं लक्ष्य पूर्ण करण्यात यश आलं आहे. शहरांमधील प्रत्येक प्रभागात संपर्क झाला असून, जवळपास १० कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास आम्ही यशस्वी झालो आहोत.
खर्च दीडपट वाढण्याची शक्यता
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, केवळ राम मंदिराच्या निर्माणासाठी प्रथम ४०० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता होती. परंतु दगडांवरील नक्षीकाम आणि वाहतुकीच्या कामात अधिक खर्च होणार असल्यानं खर्च जवळपास दीडपट वाढण्याची शक्यता आहे.
समर्पण अभियानामध्ये पारदर्शकता
श्री. राय म्हणाले, समर्पण अभियानातील पारदर्शकता ठेवण्यासाठी देशभरात ४९ नियंत्रण केंद्र बनवण्यात आले आहेत. दिल्ली स्थित मुख्य केंद्रामध्ये दोन चार्टर्ड अकाउंटंटच्या नेतृत्वाखाली खात्याच्या देखरेखीसाठी २३ योग्य कार्यकर्त्यांनी देशभरात संपर्क ठेवला आहे.