मुंबई – आठ महिन्याच्या खंडानंतर आज पाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातली धार्मिक स्थळं उघडली असून, ठिकठिकाणच्या मंदीरांमध्ये आणि अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमधे पहाटेपासून नागरीकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे.कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन मंदीरांसह इतर धार्मिक स्थळांमध्ये दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांना मोफत पास दिले आहेत.कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत भाविक अपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत.
आज सकाळी जेजुरी गडावर भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंदिर उघडण्यात आलं.यावेळी गडावर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.एका विशिष्ट वेळेत १०० भाविकांना पास देऊन मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे.भल्या पाहटे भाविकांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.मंदिरात एकावेळी केवळ ६ हजार भाविकांना प्रवेश दिला जात आहे.ऑनलाईन पद्धतिनं केलेल्या भाविकांनाच कोरोनाच्या सर्व अटींचं पालन करत दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचं नाथसमाधी मंदिर आज पहाटे काकड आरतीनं खुलं करण्यात आलं.मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरुन मास्क लावणं,सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे.बारा ज्योर्तिलिंगापैकी एक वेरुळचं ज्योर्तिलिंग घृष्णेश्वर मंदिरही भाविकांसाठी पहाटे आरती करुन खुलं केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी मंदीरात पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली आहे.आज पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली.दर्शनपास घेउन भाविकांची रांग दिसत होती.
आज दिवाळी पाडवा असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारच्या कर्नाटक मधूनही भाविक तुळजापूरला दर्शनासाठी दाखल झाले आहेत.देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी देवीचं मंदीर आज सकाळी उघडल्यानंतर,भाविकांना काकड आरतीचा मान देण्यात आला.तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे ऐन सोमवारी दर्शन झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.मंदिर देवस्थानने भाविकांसाठी नियमावली जारी केली आहे.
मुंबईतल्या अष्टविनायक मंदिरात भाजपा नेत्यांनी आणि भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात काकड आरती करत लाडक्या गणरायाचं दर्शन घेतलं.सर्व मशिदी आणि मदरशांमधे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला.हाजी अली इथं सकाळ पासून मुस्लीम बांधवांनी सर्व नियमांचं पालन करत नमाज अदा केली.
माहिम इथल्या दर्ग्यातही मुस्लीम बांधवांनी नियमांचं पालन करत नमाज अदा केली.ख्रिस्ती बांधवांच्या चर्चमध्ये त्यामानाने कमी गर्दी पहायला मिळाली.मात्र सर्व ठिकाणी कोरोना नियमांचं कठोरपणे पालन केलं जात आहे. गुरुद्वारांमध्येही सर्व शीख बांधवांनी नियमांचं पालन करत प्रार्थना केली.तिथंही मर्यादित संख्येत भाविकांना प्रवेश दिला जात आहे.