संस्कारमाला – भाग पहिला – सावित्री व्रत
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड हे श्यामचे गाव. श्यामचे कुटुंब गावातील सरदार घराणे म्हणून ओळखले जात असे. श्यामचे वडील हे शेजारच्या गावचे खोत म्हणून काम करीत असत. त्यांना शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी त्या गावी जावे लागत असे. श्यामच्या बालपणी एके दिवशी श्यामचे वडील म्हणजेच भाऊ अमावस्येच्या दिवशी वडवली या शेजारच्या गावी वसुलीसाठी गेले होते. दिवसभर सर्व कामे आटोपून रात्री ते परत घरी यायला निघाले. वाटेतच एका खोल नाल्यात काही माणसांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडे असलेले रोख पैसे व अंगावरील दागिने घेऊन पळून गेले.
त्यावेळी श्यामच्या घरी ही बातमी श्यामच्या कुटुंबाला कळली. श्यामच्या आईने त्यावेळी त्या काळातील प्रथा-परंपरेनुसार दरवर्षी वडाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालण्याच्या सावित्री व्रताचा नवस केला.
भाऊ सुखरूप घरी आले. त्यानंतर दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आई वडाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालित असे. परंतु एके वर्षी आई आजारी असल्याने प्रदक्षिणा घालू शकत नव्हती, म्हणूनच आईने श्यामला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. श्याम नकार देतो, तेव्हा आई श्यामला उपदेश करते. मग श्याम आईचे ऐकतो व वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो.
पालकांना उपक्रमविषयक माहितीपर दोन शब्द..
आजच्या श्यामच्या आई, वडिल, आजी, आजोबा आणि कुटुंबातील सर्व मान्यवरांना माझा साष्टांग नमस्कार..
आजपासून आपण संस्कारमाला उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. यात सलग ४२ आठवड्यात श्यामची आई पुस्तकातील ४२ गोष्टींवर सोमवार ते शनिवार दररोज लहानसा उपक्रम राबविणार आहोत. या नियोजनात दर सोमवारी संक्षिप्त कथानक म्हणजेच SHORT STORY असेल. आज पहिल्या सोमवारी आपण श्यामची आई पुस्तकातील पहिली गोष्ट म्हणजेच पहिल्या रात्रीचे कथानक पाहणार आहोत.
सावित्री व्रत या पहिल्या गोष्टीत साने गुरुजींनी त्यांच्या कुटुंबाची त्या कालानुरूप खूपच माहिती दिलेली आहे. आपणांस फक्त आईच्या उपदेशानुसार महत्वाचे मुद्देच मी या कथानकात घेतलेले आहेत. १०० वर्षांपूर्वीच्या लोकजीवनावर जास्त चर्चा करून विद्यार्थी बालमित्रांना गोंधळात टाकणे चुकीचे ठरेल, हा माझा आजपर्यंतचा श्यामची आई कथाकथन अनुभव आहे. आपणास आपल्या बुद्धीनुसार न गोष्ट सांगता… मुलात मुल होऊन मुलांच्या नजरेतून त्यांना गोष्ट सांगायची आहे हे समजून घ्यावे, ही विनंती.