नाशिक – शिक्षण संस्थांनी शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. तसेच, शुल्क न देणाऱ्या पाल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय शहरातील शिक्षण संस्थाचालकांना दिला आहे. तसे निवेदन संस्थाचालकांनी शिक्षण उपसंचालकांना दिले आहे. त्याला शह देण्यासाठी आता सर्वपक्षीय समितीचा पर्याय पुढे आला आहे.
शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शनिवारी (१२ डिसेंबर) सातपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्न असतानाच त्यांच्या पाल्याकडून शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी शिक्षण संस्थांनी तगादा सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यास देखील नकार देण्यात आला आहे. शिक्षण संस्थांच्या या निर्णयामुळे अनेक पालक चिंताग्रस्त झालेले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी घेतला आहे. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजता हॉटेल अयोध्या येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती डॉ. कराड यांनी दिली आहे.