नाशिक – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिकच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राकडे निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना महामारी च्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना व पालकांना आर्थिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निगडीत महाविद्यालयांत प्रवेश, परीक्षा, निकाल इ. बाबत विविध समस्या विद्यार्थ्यांना येत आहेत.
अभाविपने निवेदनात काही मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क चार टप्प्यात ( संपुर्ण शुल्काच्या १०% – १५% शुल्क ) भरण्याची मुभा देण्यात यावी व संकेतस्थळावर चार टप्प्यात शुल्क भरण्याची सोय करावी, ज्या विद्यार्थ्यांना प्रोमोट केले आहे त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, चुकीचे लागलेले विद्यापीठाचे निकाल लवकरात लवकर सुधारित लावण्यात यावे, शैक्षणिक संस्था जोपर्यंत पूर्वरत चालू होत नाही तो पर्यंत कुठल्याही प्रकारचा दंड आकारू नये, विद्यापीठाशी संलग्न नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक आयोजित करून संपूर्ण प्रवेश शुल्क एक रकमी न घेता विद्यार्थ्यांना चार टप्प्यात शुल्क भरण्याची मुभा द्यावी, असे सक्त निर्देश विद्यापीठाने द्यावे, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या निवारणासाठी विद्यापीठ उपकेंद्राने ‘हेल्पलाईन’ ची घोषणा करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
येत्या चार दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास अभाविप विद्यार्थी हितासाठी विद्यापीठ उपकेंद्रात तीव्र रोषाने आंदोलन करेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी नाशिक रोड जिल्हा संयोजक दुर्गेश केंगे , नाशिक महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार, गौरी पवार, हर्षदा कदम, अशोक सैनी, सौरभ धोत्रे, ओम माळुंजकर, कृष्णा निगळ , प्रथमेश नाईक आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.