दे आव्हान प्रस्थापिता
धरुन ठेव तुझा वसा
जाणाऱ्या काळावर
उमटव तुझाही एक ठसा…
देवीच्या असंख्य रूपांप्रमाणे तिने एकाच वेळी पतीचे अपंगत्व ते कुटुंबाची आणि संपूर्ण शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली, अश्या आजच्या आपल्या नवदुर्गेचा धाडसी प्रवास जाणून घेऊया : वनिता दिपक पूरकर
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री फार्म्स)
आडगावचेच माहेर असलेल्या वनिता ताईंचा २००१ मध्ये दिपक पूरकर यांच्याशी विवाह झाला. मूळचे चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडीचे असणारे दिपक पूरकर हे पत्नी वनिता पूरकर व लहान मुलगा यांच्यासमवेत २००८ मध्ये आडगाव नाशिक येथे ३ एकर जमीन घेऊन स्थायिक झाले. आडगाव मध्ये आल्यावर शेतीत अनेक प्रकारच्या अडचणी आल्या ज्यामध्ये, शेतजमीन ही चुनखडीची असल्याने द्राक्ष शेतीसाठी हि एक मुख्य समस्या होती. या दरम्यानच सह्याद्रीच्या मार्गदर्शनाखाली या अडचणींवर काम करून शेतीत द्राक्षाची लागवड करण्यात आली. सुरूवातीस काही प्रमाणात कर्ज घेतलेले होते.
जसजशी परिस्थिती सुधारत गेली तसे हळूहळू सर्व स्थिरस्थावर होत गेले. शेतीत उत्पन्न चांगले येत गेले. मोठ्या मेहनतीने वनिता ताई आणि पती दिपक यांच्या प्रवासाची गाडी रुळावर येत होती. तेच २०१७ साली गाडीचे एक चाक डगमगावे तशीच एक घटना घडली. द्राक्ष बागांचा छाटणी चा काळ होता आणि दिपक पूरकर यांचा गंभीर अपघात झाला आणि मुख्य म्हणजे या अपघातात त्यांच्या एकाच पायात दोन ठिकाणी फ्रॅक्चर निघाले. हा काळ वनिता ताईंसाठी कठीण होता कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दिपक यांचा पाय काढावा लागेल हाच सल्ला देण्यात आला. शेवटी इतर नातेवाईकांचा सल्ला घेत ताईंनी दिपक यांचा पाय न काढता तो पुर्ण मेहनत घेऊन बरा करण्याचा निर्णय घेतला.
एकाच वेळी अनेक संकट समोर उभी होती कारण एकीकडे पती हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत असताना घरी शेतीचे काम अर्ध्यावर राहिले होते आणि मुलगा आविष्कार हा त्यावेळी १०वीत असल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ न देणे हिदेखील जबाबदारी होती. दिपक यांच्या अपघातामुळे आणि एकूणच घर व शेतीसाठी आर्थिक गरज हि मोठ्या प्रमाणावर भासणार होती. शेवटी कुठेही न डगमगता ताईंनी हिमतीने या परिस्थितीस सामोरे जाण्याचा निर्धार केला.
दिपक हे सुरूवातीचा एक महिना ऍडमिट असल्यामुळे या काळात हॉस्पिटलला देखील नियमित जावे लागायचे आणि त्यानंतर घरचं नियोजन करत शेतीतले व्यवस्थापन ताई पाहत होत्या. या काळात नातेवाईकांमध्ये भाचा, भाऊ शिवाजी व अनिल देशमुख, रमेश गुंजाळ अशा अनेक व्यक्तींची मदत झाली. यातूनच त्या वर्षीचे शेतीचे काम मार्गी लागत होते तेच दिपक यांच्या अपघातला २-३ महीने पूर्ण झाले असताना त्यांच्या पायात इन्फेक्शन झाले आणि डॉक्टरांनी तातडीने पुन्हा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
आणखी एक कठीण काळ येऊन उभा राहीला, ज्यामध्ये दिपक यांच्या ऑपरेशनच्या वेळीच द्राक्ष बागेची हार्वेस्टिंग सुरू होती आणि दुसरीकडे मुलाचा १०वी च्या परीक्षेचा हा काळ होता. दिपक यांची जबाबदारी सांभाळत दुसरीकडे सह्याद्रीच्या माध्यमातून हार्वेस्टिंगचे काम पूर्ण करून हे सर्व व्यवस्थापन ताईंनी केले. पूर्ण 2 वर्ष दिपक यांना हे अपंगत्व होते आणि या दोन वर्षाच्या काळात त्यांचे एकूण 5 ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे या काळात पती, घर आणि शेती हे सर्व सांभाळत तारेवरची कसरत चालूच होती. या कठीण काळातही ताईंनी शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, सोबत दिपक यांना स्वत: काही करता येऊ शकत नसले तरी त्यांचे शिक्षण कृषि क्षेत्रातले असल्याने ताईंना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत होते.
सर्व जबाबदार्या सांभाळून देखील ताईंनी शेतीत चांगले उत्पन्न काढण्यात यश मिळवले. दुसरीकडे दिपक यांचीदेखील तितकीच काळजी घेतली, त्यामुळे साधारण दोन वर्षांनंतर दिपक यांना पायाने चालता येऊ लागले. मुलगा देखील आईला शेतीतल्या कामात हातभार लावू लागला. मध्यंतरी टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग करून सध्या शेतीत आरा-१५ आणि सोनाका या द्राक्ष वाणांची लागवड केली आहे.
शेतीतले व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करत असताना ‘आदर्श महिला शेतकरी पुरस्कार’ ताईंना मिळाला. खरं बघायला गेले तर हा काळ अत्यंत कठीण असला तरी आपल्यामध्ये कितीही मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद आहे याची अनुभूती या काळाने करून दिली. इतक्या खडतर प्रवासात देखील आपल्यातला आत्मविश्वास कमी न होऊ देता प्रत्येक संकटासमोर ताठ मानेने उभ्या राहणार्या या सह्याद्रीच्या नवदुर्गेस सलाम!
