परिस्थितीच्या शून्यातून
विश्व उभारलं,
तिच्या जिद्दीच्या हातांनी
दुःख, दारिद्रय हरलं…
एके काळी आलेल्या मोठ्या संकटाशी जिने न डगमगता संघर्ष केला आणि त्यातूनच आज शेतीचे चित्र पालटून आपल्या कुटुंबाची उभारणी केली, जाणून घेऊया त्या आपल्या आजच्या नवदुर्गेचा प्रवास: सुशीलाबाई तुकाराम आथरे
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री अॅग्रो फार्म)
आज सुशीलाबाईंचे वय ६० वर्ष इतके आहे. १९७९ साली त्यांचा तुकाराम आथरे यांच्याशी विवाह झाला. कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. कुटुंबात सुशीलबाईंसह सासरे, पती तुकाराम आथरे व दोन लहान मूलं पदरात होती. सर्व काही व्यवस्थित चालू असताना एक काळ आयुष्यात असा आला की हे सर्व चित्र बदलून गेले. १९९६ साली सुशीलाबाईंचे सासरे यांचे निधन झाले आणि याच घटनेच्या चौथ्या दिवशी पती तुकाराम आथरे हे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.
एकाच वेळी घरातील दोन पुरुष हे जग सोडून गेले आणि कुटुंबात फक्त सुशीलाबाई आणि त्यांच्यासोबत दोन लहान मूलं राहिली होती. तुकाराम आथरे हयात असताना त्यांच्या उपचारासाठी ७ लाख तर इतर ३ लाख असे एकूण १० लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. त्या काळी १० लाख ही खूप मोठी रक्कम होती. त्यामुळे पती, सासरे हे दोघेही नसताना सुशीलाबाईंना हे कर्ज फेडून, मुलांना सांभाळत सर्व शेतीचे व्यवस्थापन करावे लागणार होते. मूलं रामदास आणि बाळासाहेब हे त्या वेळी ११ आणि ९ वर्षांचे होते. त्यामुळे काळाने आपल्या कुटुंबाचे जे चित्र पालटले त्याला आता पुन्हा उभारी देण्याचा निर्धार सुशीला ताईंनी केला होता. त्या वेळी शेतीमधील मुख्य अडचण म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अवघड होते, त्यासाठी जवळच्या नातेवाईकांकडून शेतीबाबत मार्गदर्शन त्या घेत गेल्या. एकूण ९ एकर शेती असून त्यात ३ एकरात द्राक्ष बाग व उर्वरित भागात टोमॅटो, ऊस या पिकांची लागवड केलेली होती. काळ कठीण होता कारण कुठलाही आधार नसताना दोन लहान मूलं सांभाळून शेती करायची होती.
आजच्या काळाप्रमाणे शेतीची उपकरणे तेव्हा जास्त उपलब्ध नव्हती. मूलं लहान असून देखील आपल्या आईला जमेल तसा हातभार लावायची. बर्याचदा वातावरणाच्या बदलांमुळे रात्रीच्या अंधारात फवारणी करण्याची वेळ यायची तेव्हा ही दोन्ही मूलं आपल्या हातात बॅटरी घेऊन असत तर दुसरीकडे सुशीलाबाई फवारणी करायच्या. ट्रॅक्टरसारखी उपकरणे तेव्हा नव्हती त्यामुळे नळीच्या आधारे बागेला फवारणी करावी लागायची. हळूहळू शेतीत सुधारणा होत गेली, द्राक्ष बाग वाढवून एकूण ६ एकरात लावण्यात आली. या शेतीच्याच आधारे डोक्यावर असणारे कर्ज हे पुढील ३-४ वर्षात पुर्णपणे फेडण्यात आले.
साधारण दहा वर्षांपर्यंत सुशीलाबाई घर आणि संपूर्ण शेती त्या वेळी एकट्याने सांभाळत होत्या. पुढे शेतीची जबाबदारी वाढत गेली आणि मूलंदेखील मोठी झाली होती. सुशीलबाईंना मोठा मुलगा रामदास यांची शेतीत गरज भासू लागल्याने नाईलाजास्तव त्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही पण दूसरा मुलगा बाळासाहेब यांना द्राक्ष शेतीतील तंत्रज्ञान व कौशल्य मिळविण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पाठविले.
२००८ पासून हे कुटुंब सह्याद्रीशी जोडले गेले. आज ९ एकरचे १० एकर क्षेत्र झाले असून त्यात द्राक्ष व टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली आहे. द्राक्षात थॉमसन, क्लोन २, शरद सिडलेस व जम्बो अश्या विविध व्हारायटींची लागवड केली आहे. द्राक्षात सध्या ११०० क्विंटलच्या पुढे मालाची निर्यात केली जाते. आता शेतीची जबाबदारी मुलगा रामदास व बाळासाहेब यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आज सुशीलाबाई यांच्यासमवेत दोन्ही मूलं, सुना, नातवंडांनी कुटुंब बहरले आहे. एके काळी आलेल्या मोठ्या संकटाशी अनेक वर्ष संघर्ष करून शेतीचे व्यवस्थापन करत आपल्या कुटुंबाची उभारणी केलेल्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!