चित्र बदलण्याचा ध्यास
तिला नव्या जगाची आस…
“लोकांचं चांगलं झालं, तर आपलं चांगलं होईल..इथलं मी सांभाळते” असं म्हणत आपल्या पतीला त्यांच्या कामात प्रोत्साहित करून, स्वत: संपूर्ण शेतीचे व्यवस्थापन अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने करणार्या आजच्या आपल्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया : साधना संदिप निचीत
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री अॅग्रो फार्म)
आपल्या कुटुंबाचा विकास घडवत असताना आपल्यासारख्या इतरांना देखील कसं पुढे नेता येईल असा विचार करणार्या साधना निचीत यांचा विवाह सोनेवाडी, निफाड येथील संदिप निचीत यांच्याशी झाला. सध्या कुटुंबात साधना व संदीप निचीत यांच्या व्यतिरिक्त २ मुली, एक मुलगा व सासूबाई हे सर्व सदस्य आहेत. संदिप निचीत हे शेतकर्यांचे संघटक आणि समन्वयक म्हणून काम करत होते ज्यामध्ये ते वेगवेगळ्या गावातील शेतकर्यांना संघटित करून शेतीसंबंधीत समस्यांवर त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळवून देत असतात. या कारणाने एकाच वेळी काम आणि शेती सांभाळणे त्यांना शक्य नव्हते. आपल्या पतीचे काम हे शेतकर्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे हे समजून साधना ताईंनी त्यांना “लोकांचं चांगलं झालं, तर आपलं चांगलं होईल, तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा, इथलं मी सांभाळते” असे म्हणत आपले काम सुरू ठेवण्याचा आग्रह धरला आणि पुढे शेतीची सर्व जबाबदारी त्यांनी स्वत: आनंदाने स्वीकारली.
शेतीचे एकूण क्षेत्र १० एकर एवढे आहे आणि या पूर्ण भागात द्राक्ष लागवड केली होती. ताईंचं माहेर चांदवड तालुक्यातील हिरापूर येथील आहे, त्या भागात द्राक्ष पिकात काम नसल्याने द्राक्ष शेतीतील कुठलाही अनुभव त्यांना नव्हता. पण शिकण्याची जिद्द मात्र खूप होती, यासाठी कृषितज्ज्ञ सचिन वाळुंज यांचे सातत्याने मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यामुळे शेतीतली कुठलीही पार्श्वभूमी किंवा तितकासा अनुभव नसल्याने द्राक्ष शेतीमधील प्रत्येक पद्धती त्या बारकाईने अभ्यासत होत्या. अगदी ट्रॅक्टर चालवता येत नसून देखील स्वतः प्रयत्न करून शिकणे, काही अडचणी आल्यास त्यावर आपल्या परीने मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. यामध्ये सकाळी मुलं आणि घरच्यांचं आवरून बाकी सर्व वेळ त्या शेतीसाठी देत होत्या. सुरूवातीला सोनाका, थॉमसन, जम्बो अश्या विविध व्हारायटींची लागवड केली. मागील आठ वर्षांपासून त्या एकट्या पूर्णपणे शेती व्यवस्थापन पाहत आहे. या दरम्यान कुठलीही तक्रार न करता सर्व जबाबदाऱ्या त्या आनंदाने पार पाडत आहेत. या आठ वर्षांदरम्यान काही अडथळेदेखील आले ज्यात एका वर्षी गारपिटीने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशा प्रसंगात देखील धीर न सोडता योग्य उपाययोजना करून १०० क्विंटल पर्यंत द्राक्ष माल निर्यात केला. यामध्ये विशेष म्हणजे शेतीत कायम आधुनिक आणि नवनवीन प्रयोग करण्याचा साधना ताईंचा प्रयत्न राहिला. यानंतर गावातील इतर महिलांना देखील पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने या महिलांना त्यांनी संघटित केले. शेतीमध्ये जे काही आधुनिक बदल घडत आहेत ते पाहण्यासाठी या महिलांसोबत त्या अभ्यास दौरे करत असतात. दरम्यान सह्याद्रीच्या आरा-१५ या वाणाचा प्रयोग यशस्वी झाल्यावर रावळगांव (ता.मालेगाव) फार्मला जाऊन या द्राक्ष वाणाबद्दल सर्व माहिती घेत त्यांनी आरा-१५ ची लागवड आपल्या शेतात केली आहे.
द्राक्षशेतीत यशस्वी उत्पादन काढत दरवर्षी ९०० क्विंटलच्या पुढे माल निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो. शेतीत कमीत कमी खर्चात गुणवत्ता पूर्ण उत्पादन काढण्याच्या उद्देशाने साधना ताईंनी द्राक्षतज्ज्ञ ‘मंगेश भास्कर’ यांच्या ‘दहा ड्रम थेअरी’चे काम आता सुरू केले आहे. हि थेअरी आधुनिक पद्धतीने केली जाणारी सेंद्रिय शेती असून, यामधून जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब वाढवून पर्यावरण संतुलन राखले जाते. त्यामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा ताईंचा ध्यास आजही चालूच आहे. पतीच्या कामात प्रोत्साहन देत दुसरीकडे घरच्या शेतीत आपला आधुनिक दृष्टिकोन बाळगत यशस्वीपणे शेती व्यवस्थापन करणार्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!