सावित्री सारखी लढतेस तू….
आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून बाहेर आणत आज त्यांच्या मार्गदर्शनाने शेतीचे स्वप्न कृतीत उतरविणाऱ्या आजच्या आपल्या नवदुर्गेविषयी जाणून घेऊया : रोहिणी रमेश फलाणे
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री अॅग्रो फार्म्स)
१९९४ साली रोहिणी ताईंचा रमेश फलाणे यांच्याशी विवाह झाला. रमेश फलाणे नाशिकमध्ये नोकरीस असल्याने सर्व कुटुंब शहरामध्येच स्थायिक होते. सुरूवातीचे काही वर्ष गावकडील शेती हि वाट्याने दिलेली होती. पुढे १९९९ मध्ये रमेश फलाणे गावकडील पतसंस्थेत नोकरीस रुजू झाले. त्यामुळे त्यांना शेतीत देखील वेळ देता येऊ लागला. १९९९ पासून ते २००९ सालापर्यंत जमीन वाट्याने ते करून घेत असत. २००९ साली अचानक वाटेकरी सोडून गेला आणि स्वत: शेती व्यवस्थापन करण्याचे रोहिणी ताईंनी ठरवले. शेतीमधल्या काही क्षेत्रात द्राक्ष लागवड करण्यात आली तोपर्यंत कुठलाही शेतीचा अनुभव नव्हता, परंतु पतीच्या मार्गदर्शनाने त्यांनी ती जबाबदारी घेऊन यशस्वी करून दाखवली.
शेती, मुलांचे शिक्षण आणि पतीची नोकरी सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना अचानक एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. २०१७ मध्ये एके दिवशी रमेश फलाणे हे नाशिकहून आपल्या घरी परत येत असताना दुर्दैवाने त्यांचा मोठा अपघात झाला आणि त्या नंतरचा काळ हा रोहिणी ताईंसाठी अतिशय संघर्षाचा राहिला. कारण डॉक्टरांनी पतीच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे संगितले. पण रोहिणी ताईंनी आपला धीर सोडला नाही.
अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रमेश फलाणे हे ४० दिवस व्हेंटिलेटरवर तर त्यानंतर पुढील काही दिवस कोमात होते. साधारण तीन महिन्यांनंतर ते शुद्धीत आले होते पण अपघातामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले आणि स्वत:च्या पायाने चालणे त्यांना शक्य नव्हते. त्या वेळी कुटुंबात रोहिणी ताई यांच्या समवेत २ मुली आणि एक लहान मुलगा होता.
रमेश यांच्या अपघातानंतर उपचारासाठी ४० लाखांच्या आसपास कर्ज घ्यावे लागले. कर्जाची परतफेड आणि घरची आर्थिक गरज भागविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. रमेश हे व्हील चेयर वर असल्यामुळे त्यांना स्वत: शेतात येणे शक्य नसले तरी काही अडचण आल्यास झाडाचे पान मागवून त्याबाबत समजावून सांगणे, मोटरीच्या कामाबाबत कागदावर आकृती काढून शिकवणे, द्राक्षाचा घड बघून पुढची प्रक्रिया समजावणे अशा प्रकारे मार्गदर्शन ते ताईंना करत होते. पुढे हीच कामं हळूहळू त्या स्वत: करू लागल्या.
आज त्या आपल्या शेताचे गुणवत्ता पूर्ण नियंत्रण करून रेसिडयू फ्री द्राक्ष उत्पादन करत आहेत. थॉमसन या द्राक्ष वाणाची वर्षाला साधारणतः १२५ क्विंटलच्या पुढे द्राक्ष निर्यात करत आहेत. या काळात रमेश यांना महिन्याला नियमित हॉस्पिटलला तपासणीकरिता घेऊन जाणे, घरचे आर्थिक नियोजन करणे हि सर्व जबाबदारी घेत आज त्या जिद्दीने आपल्या शेतीचे व्यवस्थापन पाहत आहेत. कर्ज बरेच होते पण ताईंच्या म्हणण्यानुसार आपले पती आज इतक्या मोठ्या संकटातून बाहेर येत समोर आहेत यापुढे कर्जाचे मोल त्यांना नाही. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश आपोआप मागे धावत येईल हा विचार समोर ठेऊन, घरचा मुख्य आधार असणार्या शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणार्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!