“आणि टमाट्याची रोपं आलीच नाही…”
मन अगदी सुन्न झाल होतं मनीषा ताईंचं हे वाक्य कानावर पडल्यावर..कारण ज्या व्यक्तीसोबत अख्या आयुष्यभराची स्वप्न त्यांनी बघितली, ते पती बाजीराव मुंढे एक दिवस टोमॅटोची रोपं आणायला बाहेरगावी गेले असताना घाटात अपघात झाला आणि आयुष्याचा त्यांचा प्रवास थांबला. इकडे मनीषा ताई आपल्या रोपांची वाट बघत राहिल्या आणि पतीची ही बातमी सायंकाळी कानावर पडली. आपल्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती गमवल्यावर इतक्या मोठ्या धक्क्यातून बाहेर पडत आयुष्याची एक नवी सुरुवात करणार्या आजच्या आपल्या नवदुर्गेचा काळजाला भिडणारा प्रवास जाणून घेऊया : मनीषा बाजीराव मुंढे
– रुचिका ढिकले (जनसंपर्क विभाग, सह्याद्री फार्म्स)
२००४ मध्ये मनीषा ताईंचा कोनांबे जि. नाशिक येथील बाजीराव मुंढे यांच्याशी विवाह झाला. शेतीत एकूण अडीच एकर क्षेत्र होते, सोबत कर्जाचे ओझे डोक्यावर होतेच पण दोघांना एकमेकांचा खूप मोलाचा असा आधार होता. पुढे एक मुलगा आणि एक मुलगी झाली. शेतीत द्राक्षाची लागवड केलेली होती. एक बिघा क्षेत्र बाकी होते ज्यात या दोघांनी टोमॅटो लागवड करायचे असे ठरवले. एकमेकांच्या साथीने संसाराचा हा प्रवास अतिशय आनंदात पुढे जात होता.
२०१८ साली, ठरल्याप्रमाणे बाजीराव हे टोमॅटोची रोपं आणायला बाहेरगावी गेले आणि रोपं घेऊन येत असताना घाटात दुर्दैवी अपघात झाला आणि संसाराची हि रांगोळी एका क्षणात विस्कटली गेली. आपली रोपं येणार म्हणून मनीषा ताई वाट पाहत राहिल्या आणि ३.३० वाजता घडलेल्या या घटनेविषयी गावातल्या लोकांनी ताईंना त्या दिवशी ६ वाजता माहिती दिली. त्या क्षणाला आतून त्या पुर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. या घटनेदरम्यान ताईंच्या कुटुंबात केवळ दोन लहान मूलं आणि त्यांच्या सासूबाई होत्या त्यामुळे साहजिकच पतीच्या निधनानंतर हि सर्व जबाबदारी त्यांच्यावर आलेली होती.
त्या काळात पती बाजीराव हे गेल्याचा धक्का ताईंसाठी इतका मोठा होता कि पुढे काही करण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या. द्राक्षाचे बाग बांधलेले होते ते असेच बेवारस सोडता येणार नव्हते त्यामुळे शेती वाट्याने दुसर्यांना करायला दिली, वर्षभर हे असेच चालू राहिले. घरात आर्थिक चणचण भासू लागली त्यात बाजीराव यांच्या मागे असलेले कर्ज फेडायचे बाकी होते आणि मूलं शाळेत जात असल्याने त्यांचे भवितव्य ताईंवर आधारलेले होते.
बाजीराव यांच्या अपघाताला वर्ष होत आले होते आणि या सर्व परिस्थितीतून बाहेर पडून ज्या शेतीत मनीषा ताई आणि बाजीराव यांनी अनेक स्वप्न पहिली होती त्यासाठी आता स्वत: कष्ट करून कुटुंबासह मुलांचे भवितव्य घडवण्याचा निर्धार त्यांनी केला.
पती हयात असेपर्यंत जास्तीत जास्त निंदणे, खुरपणे हि कामं त्या करायच्या. पण आता शेतीत संपूर्ण व्यवस्थापन एकट्याने करायचे म्हणजे मार्गदर्शन आवश्यक होते. त्यात त्यांची शेती कोनांबे सिन्नर भागात असल्याने मुख्य अडचण म्हणजे तिकडे शेतीसाठी पाण्याचा तुटवडा जास्त होता. यातूनच गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर डावरे यांनी या प्रवासात ताईंना शेतीच्या सर्व नियोजनविषयी मार्गदर्शन केले. या दरम्यान ताई ‘सह्याद्री फार्म्स’सोबत जोडल्या गेल्या, द्राक्ष बागेतल्या कामांबद्दल सर्व प्रशिक्षण घेत ताई ते मेहनतीने करू लागल्या.
शेतात थॉमसन या द्राक्ष वाणाची लागवड केली असून त्यातील ६० क्विंटलच्या पुढे द्राक्षमाल निर्यात आणि उर्वरित स्थानिक बाजारपेठेत दिला जातो. सध्या द्राक्ष आणि टोमॅटो पिकांत चांगले उत्पन्न येत आहे यातूनच कर्ज बर्यापैकी फेडले गेले आहे. यापुढे द्राक्षामध्ये आधुनिक पद्धतीने नवीन वाणांची लागवड आणि त्यासोबतच कांद्याची लागवड करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
आता एकच ध्येय आहे ते म्हणजे पती बाजीराव यांची जशी इच्छा होती त्याप्रमाणे शेतीत चांगले यश मिळवायचे आणि सोबतच कुटुंब आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे. या सर्व प्रवासादरम्यान एक गोष्ट मात्र त्यांना कायम भावुक करून सोडत गेली ती म्हणजे पती बाजीराव यांची उणीव आणि क्षणोक्षणी येणारी आठवण!
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती असलेल्या आपल्या पतीला गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मिळवणे शक्य नसले तरी त्यांच्या स्वप्नांना आपण पूर्ण करू शकतो हे ओळखून संकटांशी तोंड देत असताना आपला लढाऊ बाणा बाळगून चालणार्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!
दिवस पुन्हा उगवतोय
सरतेय अंधारी रात
उंच उंच आभाळ सये
देतंय तुला साद…..