वाशिम – अनेक कुटुंबातील लोक अजूनही वंश चालवण्यासाठी मुलगा हवा याचा अट्टहास करत असतात. आजच्या काळात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मोठ्या पदांवर महिला सन्मानानं काम करत आहेत. याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याच्या तर्हाळाच्या तीन मुलींनी. वाघमारे कुटुंबातल्या तिन्ही मुलींनी पोलिस सेवेत दाखल होऊन आपण मुलांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिलं आहे.
नारायण वाघमारे यांच्या चार भावांमध्ये मिळून ४ एकर शेती आहे. प्रत्येक भावाला एक एकर शेती आल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण जातं. त्यामुळे वाघमारे कुटुंब मजुरी करतं. प्रिया, भाग्यश्री, श्रद्धा अशी तिन्ही मुलींची नावं आहेत.
नारायण वाघमारे यांनी कधीही मुली असल्याचा राग केला नाही किंवा त्यांचा कामासाठी आधार घेतला नाही. तिन्ही मुलींना बारावीपर्यंत शिक्षण दिलं. मोठी मुलगी प्रियानं पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या विरोधानंतर समाजाची चिंता होती. लोक काय म्हणतील, पोलिस खात्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत, ते कसे दूर करायचे, मुलीसाठी क्षेत्र योग्य असेल का या सर्व गोष्टींवर मात करत प्रिया २०१४ मध्ये पोलिस दलात दाखल झाली.
तिनं तर्हाळा गावात प्राथमिक शिक्षण घेतलं. तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. शिक्षणादरम्यान पोलिस प्रशिक्षण अॅकॅडमी चालवणार्या अनिल मानेकर यांचं लक्ष प्रिया वाघमारे यांच्यावर गेलं. शारिरीकदृष्ट्या उत्तम बांधा असल्यानं त्यांनी प्रियाच्या पालकांची भेट घेतली. त्यांना विश्वासात घेतलं. घरातील सदस्याप्रमाणे शिक्षण दिलं.
प्रियाच्या मेहनतीमुळे तिला पोलिस दलात नोकरी लागली. मोठ्या बहिणीला पाहूनच भाग्यश्री आणि श्रद्धानंही पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोघींचीही २०१८ मध्ये पोलिस भरतीत शिपाई पदासाठी निवड झाली. सध्या प्रिया वाशिमच्या आसेगाव पोलिस ठाण्यात तर भाग्यश्री आणि श्रद्धा अकोला इथं कर्तव्य बजावत आहेत.
समज काय म्हणेल असा एकीकडे विचार आणि दुसरीकडे आईचं मन असल्यानं मुलींना पोलिस दलात पाठवण्यासाठी प्रतिकूल मत होते. तरीही नंतर ते राजी झालेच. आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आज तिन्ही बहिणी पोलिस खात्यात चांगलं काम करत आहेत. पोलिस दलातील अधिकारी कर्मचार्यांमुळे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत आहे. पुढे मोठ्या पदांवर जाण्याचं तिन्ही बहिणींचं स्वप्न आहे.