पिंपळनेर, ता. साक्री – साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अतिवृष्टी ने नुकसानग्रस्त भागात शासकीय अधिकाऱ्यांसह आमदार मंजुळा गावित यांनी पाहणी दौरा केला.
ऑगस्ट महिन्यामध्ये संततधार चाललेल्या पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही गावांमध्ये सोयाबीन, मका, काढणीला आलेल्या उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच शुक्रवारी जोरदार वारा, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले. कुडाशी, वार्सा, उमरपाटा, नांदुर्खी, महुमाळ, कडूपाडा, बसरावळ या नुकसानग्रस्त भागाचा आमदार मंजुळा गावित यांनी दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांचे समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तुळशीराम गावित, अप्पर तहसीलदार थविल, तालुका कृषी अधिकारी सी के ठाकरे, अजित बागुल, पिंपळनेर मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर तसेच महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेती पिकांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना गावित यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर शासनाकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिले आहे.