भोपाळ – आई-वडिलांना वाळीत टाकणाऱ्या मुलांना धडा देणारी एक घटना मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात घडली. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेत आहे. कारण मुलांवर नाराज असलेल्या एका बापाने चक्क कुत्र्यालाच संपत्तीचे वारसदार केले.
अक्षय कुमारचा ‘एन्टरटेन्मेंट’ हा चित्रपट अजूनही भारतीय प्रेक्षक विसरले नाहीत. या चित्रपटात एक उद्योगपती आपली संपूर्ण संपत्ती कुत्र्याच्या नावावर करतो. छिंदवाड्यातील बाडीबाडा गावातील एका शेतकऱ्यानेही आपली अर्धी संपत्ती कुत्र्याच्या नावावर केली आहे. कुत्र्याचे नाव जॅकी आहे. आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे दुःखी असलेल्या शेतकऱ्याने चक्क वारसापत्रात लिहीले आहे की कुत्राच पूर्णवेळ आपली काळजी घेतो. त्यामुळे जो जॅकीची काळजी घेतली तोच संपत्तीचा भागीदार असेल. ओम नारायण वर्मा नावाच्या शेतकऱ्याने आपल्या पाळीव कुत्र्याला पैतृक संपत्तीचा कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून नामंकित केले आहे. वर्मा यांनी म्हटले आहे की, ‘माझ्याकडे जवळपास २१ एकर जमीन आहे. मी आपल्या संपत्तीचा अर्धा भाग पत्नीच्या आणि अर्धा भाग कुत्र्याच्या नावावर करीत आहे.’ छिंदवाडा येथील चौरई ब्लॉक बाडीबाडी गावात राहणारे ५० वर्षीय ओम नारायण वर्मा यांनी दोन लग्नव केली आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला तीन मुली व एक मुलगा तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मात्र वारसापत्रात त्यांनी कुठेही मुलांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. आता मात्र कुत्र्याची सेवा करणाऱ्यालाच वारसदार मानले जाणार आहे.