नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. ६ फेब्रुवारीला शेतकरी संघटनांनी देशभरात चक्काजाम करण्याची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्यांवर काटेरी कुंपण, खिळ्यांची चादर, खोल खंदक, सिमेंटच्या पक्क्या भिंतीप्रमाणे अडथळे लावले आहेत.
कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या घोषणेमुळे गाझीपूर, टिकरी, सिंघू या दिल्लीच्या सीमाभागात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. २६ जानेवारीला शेतक-याच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. लोखंडी बॅरिकेड्स, रस्त्यावर खिळ्यांची चादर, सिमेंटची सळ्यांची नवी भिंत उभारण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी १२ ते ३ दरम्यान नॅशनल आणि राज्य मार्ग पूर्णपणे ठप्प केले जाणार आहेत, असं भारतीय किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितलं. शेतक-यांच्या इशा-यानंतर पोलिस आणखी सतर्क झाले आहेत. गाझीपूर, सिंघू आणि टिकरी या दिल्लीच्या सीमाभागात शेतकर्यांची संख्या वाढली आहे. सरकार जोपर्यंत कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे.
पोलिसांनी कशी उभारली सुरक्षेची भिंत
शेतक-यांनी उभारलेल्या तंबूंजवळ बॅरिकेड्स लावले आहेत. ते शेतक-यांनीच लावले आहेत. त्याच्यापुढे दिल्ली पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड्सचे दुहेरी अडथळे लावले आहेत. नंतर सिमेंटचे दुहेरी अडथळे आहेत. त्यापुढे सामान्य बॅरिकेड्स आहेत. त्याच्या मध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही किना-यांपर्यंत तीन-तीन फूट खिळ्यांची चादर आंथरली आहे. त्याच्यापुढे सिमेंटचे अडथळे लावून त्यामध्ये लोखंडी सळ्या आणि सिमेंट काँक्रिट भरले आहे. त्याच्याहीपुढे बॅरिकेडिंग केली असून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.